मुंबई - देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असतानाच त्यात आपलेही योगदान देण्यासाठी आयआयटी मुंबईतील २३ माजी विद्यार्थी सरसावले आहेत. प्रत्येक महिन्याला तब्बल एक कोटी म्हणजे दिवसाला ३ लाखांहून अधिक नागरिकांची कोरोना तपासणी करण्याची क्षमता असलेली सर्वात मोठी कोरोना तपासणी लॅब लवकरच उभी केली जाणार आहे.
आयआयटीतील माजी विद्यार्थ्यांकडून तयार करण्यात येत असलेली ही लॅब, येत्या काही दिवसात तयार होणार असून 1 कोटी नागरिकांची तपासणी करण्याची क्षमता या लॅबमध्ये असणार आहे, असे आयआयटी माजी विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष रवी शर्मा यांनी सांगितले. ही लॅब कुठे उभारणार यावर अद्याप निर्णय झाला नसला तरी मुंबई, अथवा नवी मुंबई परिसरात लॅब असेल, असे सांगण्यात येते आहे.
देशात सर्वात जास्त मुंबईत कोरोना विषाणूचे रुग्ण आहेत. त्यामुळे नागरिकांची तपासणी होणे गरजेचे असल्याने आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक फिरती लॅब दिली होती. त्यानंतर जगभरात विविध संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी देशावर आलेले संकट लक्षात घेऊन देशातील सर्वात मोठी लॅब उभी करण्याची तयारी केली आहे.
मुंबईत कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण असून कोरोनाबाधित रुग्णांची तपासणी करण्यासाठी लॅबवर मोठा ताण आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोनाच्या तपासणीसाठी एक मोठ्या लॅबची गरज मुंबई शहराला आहे. ती गरज आम्ही ओळखली असून त्यासाठी आम्ही कामाला लागलो आहे. आम्ही तयार करत असलेल्या लॅबमध्ये सर्व मुंबईकर एका महिन्यातच आपली कोरोनाची तपासणी करू शकणार आहेत. तपासणीचा दर्जा उत्तम आणि सर्वात कमी पैशात आम्ही नागरिकांना तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. आम्ही तयार करत असलेल्या लॅबमध्ये अत्याधुनिक यंत्र, तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक, आर्टिफिशल इंटिलेजन्सी, लर्निंग मशीन, रोबोटिक्स असणार आहेत. त्यांच्या मदतीला डॉ. के विजय राघवन आणि विविध आयआयटीचे संचालक असणार आहेत. जगभरात काम करत असलेले हजाराहून अधिक माजी विद्यार्थी यावेळी कोरोनावर उपाय शोधण्यासाठी आपले योगदान देणार असल्याचे आयआयटी माजी विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष रवी शर्मा यांनी सांगितले.