मुंबई - राज्यात काही दिवसापासून वातावरणात मोठे बदल झाले आहेत. विविध ठिकाणी अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. तर काही ठिकाणी जोरदार गारपीटही झाली. आता येत्या चार दिवसांत अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आली. दक्षिण अरबी समुद्रात १५ मे रोजीच्या आसपास चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे हवामान खात्याकडून अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मच्छिमारांना किनाऱ्यावर परत येण्याचा इशारा -
अरबी समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छिमारांना परत बोलवण्यात येत आहे. एकीकडे अवकाळी पावसाचा धोका असताना आता चक्रीवादळामुळे राज्यासमोर नवीन संकट उभे राहिले आहे.
किनारपट्टीवर राहणाऱ्यांना हाय अलर्ट -
दक्षिण अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होत आहे. त्यानंतर हे चक्रीवादळ उत्तर पश्चिमेला सरकण्याची शक्यता आहे. १४ मे पासून केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना हाय अलर्ट देण्यात आला आहे.
हे ही वाचा - दिलासादायक! राज्यातील प्रमुख जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्येत घट
मान्सूनवर परिणाम होणार का ?
पुढचे काही दिवस मच्छिमारांनी समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. याबरोबर यंदा एक जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होणार होता मात्र अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या स्थितीचा मान्सूनवर काही परिणाम होतो का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. चक्रीवादळाची तीव्रता आणि कालावधी किती राहील, यावर मान्सूनच्या आगमनाची तारीख अवलंबून असेल. मान्सूनच्या आगमनाच्या दरम्यान येणाऱ्या चक्रीवादळामुळे अनेकदा मान्सूनची प्रगती वेगाने होते. मात्र, चक्रीवादळ येऊन गेल्यावर वाऱ्यांचा प्रवाह सुरळीत होऊन पुन्हा बाष्प जमा होण्यास किमान आठवडाभराचा कालावधी लागत असल्यामुळे मान्सूनची वाटचाल काही काळ रोखली जाते.