मुंबई - मुंबई शहरातल्या बांद्रा भागातील ए के मार्ग, बेहराम नगर, रजा मस्जिद जवळ एक चार मजली बांधकाम असलेले घर कोसळले आहे. दुपारी ४ च्या दरम्यान हे बांधकाम कोसळले असून, ढिगाऱ्याखाली काही जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी ९ जणांना बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. ढिगाऱ्याखाली अजून कोणी अडकले आहे का? याचा शोध घेण्यात येत आहे.
बुधवार ठरला दुर्घटनावार
मुंबईत रोजच आगी लागण्याच्या आणि घर कोसळण्याच्या घटना घडतात. चार दिवसापूर्वी नाना चौक येथील सचिनम हाईट्सला आग लागून ६ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी सकाळी साकिनाका येथे गॅस गळती होऊन ३ जण जखमी झाले. तर दुपारी बांद्रा येथे एक इमारत कोसळून त्याखाली काही जण अडकल्याने त्यांची सुटका करण्यात आली आहे. यामुळे आज बुधवार हा दुर्घटनावार ठरला आहे.
साकिनाक्यात गॅस लिकेजमुळे आग, ३ जण जखमी
अंधेरी पूर्व साकिनाका काजू पाडा नेताजी नगर येथील जैन सोसायटीमध्ये सकाळी ८ च्या सुमारास गॅस लिकेज होऊन आग लागली. या आगीत हकीम खान (वय ५० वर्षे), सोहेल खान (वय २४ वर्षे), सहिम अन्सारी (वय ३४ वर्षे) हे ३ जण जखमी झाले. त्यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आग ८.४५ वाजता विझवण्यात अग्निशमन दलाला यश आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
शोध मोहीम सुरू
ढिगाऱ्याखालून काढलेल्या ९ जणांपैकी ४ जणांना व्ही एन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये २ पुरुष आणि २ महिला आहेत. तर २ जणांना बांद्रा भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात १ महिला आणि १ पुरुष आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का यासाठी शोध मोहीम अद्यापही सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
जखमींची नावे
व्ही एन देसाई रुग्णालय
1. नाहीद शेख
2. नगमा शेख
3. मो. नसीम खान
4. मो. अकीब हुसेन
बांद्रा भाभा रुग्णालय
1. जावेद युनूस
2. नाझीया हुसेन
3. संतोष मोंडल
4. फकरे इस्माईल शाह
5. मोईनुद्दीन खान