मुंबई- एसटी महामंडळाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी खूशखबर आहे. राज्य शासनाच्या धर्तीवर एसटी महामंडळातदेखील पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला आहे. तसेच साेमवार ते शुक्रवार दरम्यान कामाच्या वेळेत ४५ मिनिटांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यातील शासकीय कार्यालयांना २९ फेब्रुवारी २०२० पासून पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने ८ जुलै २०२१ राेजी झालेल्या बैठकीत महामंडळात पाच दिवसांचा आठवडा करण्यास मंजुरी दिली आहे. महामंडळाचे मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालय, भाेसरी येथील मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था येथील कर्मचाऱ्यांंना हा नियम लागु हाेणार आहे. त्यामुळे महिन्याचे सर्व शनिवार आणि रविवार सुट्टीचे दिवस असतील. तसेच या कार्यालयांच्या कामकाजाची वेळ ४५ मिनिटांनी वाढविण्यात आल्याने साेमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ६. १५ अशी राहील. या कार्यालयातील शिपायांंसाठी कामकाजाची वेळ सकाळी ९.३० के संध्याकाळी ६.३० राहील. कार्यालयीन वेळेमध्ये दुपारी एक ते दाेन या वेळेत जास्तीत जास्त अर्ध्या तासाची भाेजनाची सुट्टी राहिल.
हेही वाचा-राज्याला केंद्राकडून नाही मिळणार ओबीसींचा इम्पेरिकल डेटा? लोकसभेतील केंद्राच्या उत्तरामुळे झाले स्पष्ट!
या विभागांना पाच दिवसांचा आठवडा नाही-
एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटीतील ज्या आस्थापनांना कारखाना अधिनियम लागू आहे किंवा औद्योगिक विवाद अधिनियम लागू आहे, किंवा काही सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात. अशा महामंडळातील आगार, विभागीय भांडार, विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा, टायर पुर्नस्थितीकरण केंद्र, मध्यवर्ती कार्यशाळा पाच दिवसांचा आठवडा लागू राहणार नसल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा-विमानतळाचे कार्यालय मुंबईतच राहणार; अदानी ग्रुपचे स्पष्टीकरण