मुंबई - पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी थर्माकोलवर बंदी आणण्यात आली. थर्माकोल बंदीनंतर गणेशोत्सवात डेकोरेशन कशाचे करायचे, हा प्रश्न गणेशभक्तांसमोर उभा राहिला होता. यावर व्यवसायाने डॉक्टर असलेल्या तेजस लोखंडे यांनी गणेश सजावटीसाठी कॅनव्हास फ्रेमच्या माध्यमातून एक नवा पर्याय गणेश भक्तांना उपलब्ध करून दिला आहे.
इको फ्रेंडली मखराबरोबरच लोखंडे यांच्या कॅनव्हास फ्रेमलाही मोठी मागणी आहे. सजावटीसाठी वेळ मिळत नसलेल्यांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. गणेश विसर्जन झाल्यानंतर ही फ्रेम टाकून देणे किंवा माळ्यावर ठेवण्याचाही प्रश्न नाही. कापडाने बनवलेली फ्रेम घरच्या भिंतीवर लावून घराची शोभा वाढवता येऊ शकते. तसेच ही फ्रेम 10 वर्षां पेक्षाही जास्त काळ टिकू शकते.
आयुर्वेदिक डॉक्टर असल्याने निसर्ग आणि माझे जवळचे नाते आहे. मला रांगोळी काढण्याची प्रचंड आवड होती. त्यानंतर मी स्वास्थ्यरंग परिवाराची निर्मिती केली. गत वर्षी थर्माकोल बंदी झाली होती. मी 2008 साली कपड्याच्या प्रकारात मोडणाऱ्या कॅनव्हासवर कॅलिग्राफी आणि लाकूड यांची सांगड जमवत फ्रेम तयार केली होती. मग मी विचार केला, की अशा फ्रेम सर्वांपर्यंत का पोहोचवू नये, म्हणून मी त्या 2017 पासून लोकांपर्यत पोहोचवण्यास सुरुवात केली. पांडुरंग आणि श्रीराम आदींचे चित्रही मी तयार केले आहेत. एक फ्रेम बनवण्यासाठी दोन दिवस जातात. यासाठी मला परदेशातूनही ऑर्डर येत आहेत, असेही लोखंडे यांनी सांगितले.