मुंबई- पोलीस खात्याचे तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर या संदर्भात सीबीआयकडून गुन्हा नोंदवला गेला होता. अनिल देशमुख यांची नागपूर येथील निवासस्थानी तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली होती. चौकशीअंती ईडीने अनिल देशमुख यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग संदर्भातील गुन्हा दाखल केला आहे.
काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित 10 ठिकाणी सीबीआयकडून छापेमारी करण्यात आलेली होती. यानंतर सीबीआयकडून करण्यात आलेल्या कारवाईच्या अहवालाचा अभ्यास करून ईडीकडून सुद्धा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ईडीने गुन्हा नोंदविल्यानंतर आता यासंदर्भात कलम 50 प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंगच्या अंतर्गत अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयकडून 100 कोटींच्या वसुलीच्या संदर्भात चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केलेल्या निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याची चौकशी सीबीआयकडून करण्यात आल्यानंतर, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, या प्रकरणातील महिला तक्रारदार एडवोकेट जयश्री पाटील यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पीए व स्वतः अनिल देशमुख यांची चौकशी सीबीआयकडून करण्यात आलेली असून सीबीआयच्या विशेष न्यायालयात या प्रकरणातील अहवाल सादर करण्यात आला आहे.