मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ( BMC Elections ) सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ आणि मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. मात्र या निवडणुकीपूर्वी अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके ( Shiv Sena MLA Ramesh Latke ) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेची निवडणूक ( Andheri By-Election ) होण्याची शक्यता आहे. या जागेसाठी शिवसेनेने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके ( Rituja Latke ) यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. तर, भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिवसेनेचे आव्हान स्वीकारून मुरजी पटेल या नगरसेवकाला लटके यांच्या विरोधात रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेची बातजी कोण मारणार याकडे सर्व राजकीय पक्षांच्या आणि जनतेचे लक्ष लागले आहे त्याचे कारण म्हणजे ही जागा सध्या जनतेच्या मनात काय आहे हे ठरवणारी असेल असे मानले जात आहे.
भाजपसाठी निर्णायक लढत - शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांचा अंधेरी पूर्व मतदार संघावर चांगला प्रभाव होता. त्यांच्या पश्चात त्यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देऊन शिवसेनेने जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचा या मतदारसंघात असलेला प्रभाव आणि ऋतुजा लटके यांना मिळणारी सहानुभूती ही शिवसेनेसाठी जमेची बाजू आहे तर भाजपा आणि शिंदे गटाला मात्र ही जागा जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केले. ही लढत शिवसेनेसाठी जितकी महत्त्वाची आहे त्यापेक्षा अधिक भाजपा आणि शिंदे गटाला जनता आपल्या बाजूने आहे हे दाखवण्यासाठी महत्त्वाची असणार आहे असेही भावसार म्हणाले.
महापालिका निवडणुकांची रंगीत तालीम - अंधेरी येथील होऊ घातलेली पोटनिवडणूक Andheri Assembly By-Election ही सर्व बाबतीत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीतून जन्मताचा कौल कुणाच्या बाजूने लागू शकेल याचा प्राथमिक अंदाज येणार आहे. ही निवडणूक मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या आधीचे जणू रंगीत तालीमच असणार आहे यासाठी शिवसेना आपल्या पद्धतीने प्रयत्न करतेच आहे. मात्र, भाजपाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आशिष शेलार यांनी आव्हान स्वीकारले असून आता भाजप आणि शिंदे गटाची ही खरी कसोटी असणार आहे त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची आणि अत्यंत चुरशीची होणार आहे, यात शंका नाही असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषण दिलीप सपाटे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील याचिकेवर आज घटनापीठाकडे सुनावणीची शक्यता