मुंबई - महानगरपालिकेत अभियंता हे पद महत्वाचे असते. अभियंत्यांकडून नागरी सुविधेसह अंदाजपत्रक बनविण्यापासून प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणीची कामे केली जातात. मात्र, या महत्वाच्या अभियंत्यांची ४ हजार ४८२ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३ हजार ५१३ पदे कार्यरत असून ९६९ पदे अजूनही रिक्त असल्याची माहिती (आरटीआय) माहितीच्या अधिकाराद्वारे समोर आली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेच्या नगर अभियंता कार्यालयाकडे अभियंत्यांची किती पदे मंजूर आहेत, कार्यरत किती पदे आहेत तसेच रिक्त पदे किती, याची माहिती विचारली होती. त्यानुसार नगर अभियंता कार्यालयाने अनिल गलगली यांना १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१८ या तिमाही अहवालाची प्रत दिली आहे. या अहवालानुसार कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता, सहाय्यक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि उप प्रमुख अभियंत्यांची एकूण ४ हजार ४८२ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३ हजार ५१३ पदांवर अभियंते कार्यरत असून ९६९ पदे रिक्त असल्याचे नोंद आहे.
या अहवालानुसार उप प्रमुख अभियंत्यांची ७६ पदे मंजूर असून ४६ पदे कार्यरत आहे. तर ३० पदे रिक्त आहेत. कार्यकारी अभियंता २८८ पदे मंजूर असून २१४ अभियंता कार्यरत आहेत, तर ७४ पदे रिक्त आहेत. सहाय्यक अभियत्यांची ७८१ पदे मंजूर असून ७०३ पदे कार्यरत असून ७८ पदे रिक्त आहेत. दुय्यम अभियंत्यांची २ हजार १७० पदे मंजूर असून १ हजार ८०८ पदे कार्यरत आहेत तर ३६२ पदे रिक्त आहेत. कनिष्ठ अभियंत्यांची १ हजार १६७ मंजूर आहेत ७४२ कनिष्ठ अभियंता कार्यरत आहेत तर ४२५ पदे रिक्त असल्याची आहवालात नोंद आहे. ही पदे लवकरात लवकर भरावी यासाठी गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांना पत्र पाठविले आहे