मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली. या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या (Genome Sequencing Test) करण्यात आल्या. या चाचण्यांच्या सातव्या फेरीत मुंबईत ‘ओमायक्रॉन’चे (Omicron) ५५ टक्के, आठव्या फेरीत ८९ टक्के रुग्ण आढळून आले होते. नवव्या फेरीत त्यात वाढ होऊन ९५ टक्के ‘ओमायक्रॉन’चे रुग्ण आढळून आले आहेत. चाचण्या केलेल्या १९० पैकी २३ रुग्णांचा मृत्यू झाला असून १५ जणांनी लस घेतली नव्हती. मृत २३ पैकी २१ जण हे ६० वर्षांवरील व इतर आजार असलेले होते, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
१९० पैकी ९५ टक्के ‘ओमायक्रॉन’चे रुग्ण -
मुंबईत गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान कोरोनाच्या तीन लाटा आल्या आहेत. या लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. डिसेंबरपासून तिसऱ्या लाटेत कोरोनाचा नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णातही वाढ झाली आहे. मुंबईत कोणत्या प्रकारच्या विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत, त्या विषाणूचा किती प्रसार झाला आहे याची माहिती मिळवण्यासाठी पालिकेकडून वेळोवेळी नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या केल्या जात आहेत.
पालिकेकडून ९ व्या फेरीतील चाचण्यांसाठी २८२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १९० नमुने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील होते, तर उर्वरित नमुने हे बृहन्मुंबई मनपा क्षेत्राबाहेरील होते. बृहन्मुंबई मनपा क्षेत्रातील १९० नमुन्यांपैकी ९४.७४ टक्के म्हणजेच, १८० नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या व्हेरिएंटचे असल्याचे निदर्शनास आले. १.५८ टक्के म्हणजेच ३ नमुने हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ या व्हेरिएंटचे, ०.५३ टक्के म्हणजे १ रुग्ण डेल्टा तर ३.१६ टक्के म्हणजे ६ रुग्ण इतर व्हेरिएंटचे असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
६१ ते ८० वयोगटातील ३९ टक्के रुग्ण -
९ व्या फेरीतील चाचणींमधील १९० रुग्णांपैकी ३९ टक्के म्हणजे, ७४ रुग्ण हे ६१ ते ८० या वयोगटांतील आहेत. या खालोखाल २२ टक्के म्हणजेच, ४१ रुग्ण हे ४१ ते ६० या वयोगटांतील आहेत. १९ टक्के म्हणजेच, ३६ रुग्ण हे २१ ते ४० या वयोगटांतील आहेत. १२ टक्के म्हणजेच, २२ रुग्ण हे ८१ ते १०० या वयोगटांतील, तर ९ टक्के म्हणजे १७ रुग्ण हे ० ते २० या वयोगटांतील आहेत. १९० पैकी वय वर्ष १८ पेक्षा कमी असलेल्या वयोगटांमध्ये १३ जण मोडतात. त्यापैकी ११ जणांना ओमायक्रॉनची बाधा, एका जणाला डेल्टा डेरिव्हेटिव्हची बाधा तर एकाला इतर व्हेरिएंटची लागण झाली.
१०६ रुग्णालयात दाखल -
१९० पैकी १०६ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यापैकी पहिला डोस घेतलेले ५ जण रुग्णालयात दाखल झाले. दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी ५० जण, लसीचा एकही डोस न घेतलेले ५१ जण रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालयात दाखल १०६ पैकी फक्त ९ जणांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागला. तर, ११ जणांना अतिदक्षता उपचारांची गरज भासली.
६० ते ८० वयोगटांतील १३ मृत्यू -
एकूण १९० संकलित नमुन्यांपैकी २३ नमुने मृत रुग्णांशी संबंधित संकलित केले आहेत. मृत रुग्णांमध्ये वयवर्ष ६० ते ८० या वयोगटांतील १३, तर ८१ ते १०० या वयोगटांतील ८ अशा एकूण २१ नागरिकांचा समावेश आहे. प्रामुख्याने ते सहव्याधिग्रस्त देखील होते. मृतांपैकी १५ जणांनी कोविड लसीचा एकही डोस घेतला नव्हता. २३ पैकी २१ नागरिकांना ओमायक्रॉन, तर इतर दोघांना अन्य व्हेरिएंटची लागण झाली होती. लक्षणे आढळल्याच्या सातव्या दिवसानंतर २२ जणांचा तर सात दिवसांच्या आत एकाचा मृत्यू झाला होता.
कोरोना नियमांचे पालन करा -
विविध व्हेरिएंटची होणारी लागण लक्षात घेता, ‘कोविड - १९’ विषाणू प्रतिबंधात्मक निर्देशांचे काटेकोर पालन प्रत्येकाने आपापल्या स्तरावर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘मास्क’चा वापर, दोन किंवा अधिक व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर राखणे, नियमितपणे साबण लावून हात धुणे, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने करण्यात आले आहे. सर्व मुंबईकर नागरिकांनी या उपाययोजनांची कटाक्षाने व कठोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.
हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत सोमवारी १९२ नव्या रुग्णांची नोंद, २ रुग्णाचा मृत्यू