मुंबई - एकीकडे गेल्या एका महिन्यापासून बेकायदेशीर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघाला नाही. तर, दुसरीकडे एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने महामंडळाकडून जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. आज तब्बल १९२ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या आता ९ हजार ३८४ पोहचली आहे. तर, १ हजार ९८० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा - 2149 परदेशी प्रवाशांच्या चाचण्या, मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह परदेशी प्रवाशांची संख्या 10 वर
संपामुळे ४५० कोटींचे नुकसान -
राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ केली. मात्र, कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. संप सुरूच ठेवण्याची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे, एसटी महामंडळाकडून कारवाई सुरूच ठेवण्यात आली असून आज तब्बल १९२ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. तर, १ हजार ९८० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. एक महिन्याहून अधिक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यामुळे राज्यात ४५० कोटींचे नुकसान झाले आहे.
१ हजार ३८२ एसटी बसेस धावल्या -
एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करा, या मागणीसाठी मागील ३५ दिवसांपासून कर्मचारी संपावर गेले आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा राज्य सरकारने केली. तरी देखील कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम राहिले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. मात्र, कर्मचारी रुजू न झाल्याने कारवाईचा बडगा उगरण्यात आला आहे.
आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत राज्यातील विविध मार्गांवर १ हजार ३८२ एसटी धावल्या. त्यामध्ये २११ शिवशाही, ७८ शिवनेरी आणि १ हजार ९३ साध्या गाड्यांचा समावेश आहे. तर, १८ हजार ८२८ कर्मचारी कामावर रुजू झाले. यामध्ये २ हजार १२४ चालक तर, २ हजार २९४ वाहकांचा समावेश आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
हेही वाचा - Maharashtra Corona Update : शुक्रवारी राज्यात 664 नवे कोरोना रुग्ण; तर 915 रुग्णांना डिस्चार्ज