मुंबई - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजारात मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझरची मोठी मागणी होत आहे. मात्र या कठीण काळातही काही लोक हॅन्ड सॅनिटायझर आणि मास्क यांची साठेबाजी करत आहेत. अंधेरी येथे हॅन्ड सॅनिटायझर आणि मास्कचा मोठा साठा असून त्यांची दुप्पट किमतीने विक्री होत असल्याची माहिती, मुंबई शहरातील गुन्हे शाखेला मिळाली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्राप्त माहितीनुसार धडक कारवाई करत, अंधेरी मरोळ परिसरात 76 लाखांचे मास्क व हॅन्ड सॅनिटायझर जप्त केले. तसेच या कारवाईत 2 आरोपींना अटक केली आहे.
हेही वाचा... धारावी पूर्णतः लॉकडाऊन करा... 'या' खासदाराने मुख्यमंत्र्यांना केली विनंती
अंधेरी मरोळ परिसरात स्टॅंडर्ड प्रॉडक्ट्स मॅन्यूफॅक्चरिंग कंपनीजवळ गुन्हे शाखेच्या युनिट 10ने केलेल्या कारवाईदरम्यान तीन टेम्पो ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली. यावेळी पोलिसांना 100 मिलीच्या 40 लाख किंमतीच्या 20 हजार 16 हॅन्ड सॅनिटायझरच्या बाटल्या, 50 मिलीच्या 1 लाख 8 हजार किंमतीच्या 1 हजार 80 हॅन्ड सॅनिटायझरच्या बाटल्या, या बरोबरच एन-95चे 15 लाख किंमतीचे 6 हजार मास्क आणि 20 लाखांचे 1 हजार पीपीई किट मिळाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी फरहान हुसेन रोशनअली पटेल आणि आमिर हुसेन मोहसीन रजा जाफरी या दोघांना अटक केली आहे.