मुंबई - मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बेड कमी पडत आहेत. ऑक्सिजन, आयुसीयू, व्हेंटिलेटर बेड मिळत नसल्याची तक्रार रोजच येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 4 आणि 5 स्टार हॉटेलने आपले बेड उपलब्ध करून द्यावेत, त्याठिकाणी प्रशिक्षित डॉक्टरांसह कोरोना केअर सेंटर सुरू करावीत, अशी विनंती महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी केली आहे.
रात्री बेड उपलब्ध होण्यासाठी वॉर्ड वॉर रूममध्ये नोडल अधिकारी नेमण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड वाढवले जात असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली.
नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक -
कोरोना रुग्णांना रात्रीचे बेड मिळत नाहीत, अशी तक्रार मोठ्या प्रमाणात आहे. यावर उपाय म्हणून रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत वॉर्ड वॉर रूम आणि जंबो कोविड सेंटर अशा दोन्ही ठिकाणी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. बेड उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या दोघांवर असेल. रात्रीच्या वेळेत फक्त जंबो कोविड सेंटरमध्येच रुग्णांना बेड द्यावेत जेणे करून रुग्णांना लवकरात लवकर बेड उपलब्ध होतील. ज्यांच्या चाचण्या झाल्या नसतील अशा रुग्णांना जंबो कोविड सेंटरमध्ये संशयित रुग्ण म्हणून ऍडमिट करून त्याच्यावर उपचार करावेत, असे आयुक्तांनी म्हटले आहे.
आणखी बेड उपलब्ध होणार -
मुंबईत रुग्णालयांमधील ३२५ आयसीयू अतिरिक्त बेड उपलब्ध झाल्याने एकूण २४६६ आयसीयू बेड झाले आहेत. रुग्णालयात सध्या एकूण १९ हजार १५१ बेड असून ३७७७ बेड रिक्त आहेत. पालिका येत्या सात दिवसात अतिरिक्त १२५ आयसीयूसह ११०० बेड उपलब्ध करून देणार आहे. मुंबईत ३ ठिकाणी जंबो कोविड सेंटर उभारण्यात येतील त्यात २ हजार बेड असतील. त्यात २०० आयसीयू तर ७० टक्के बेड हे आयसीयूचे असतील.
लक्षणे असलेल्या रुग्णांच्या चाचण्या -
कोरोनाच्या भीतीने अनेक जण चाचण्या करतात. अशा चाचण्या करताना लक्षणे असलेल्या रुग्णांच्या चाचण्या करण्यावर भर द्यावा असे आदेश पालिका आयुक्तांनी खासगी लॅब चालकांना दिले आहेत. खासगी रुग्णालयात चाचण्या केल्या जातात त्याचे अहवाल रात्री १२ वाजेपर्यंत पालिकेला व दुसऱ्या दिवशी रुग्णांना देण्यात यावेत. जेणेकरून पालिकेच्या वॉर्ड वॉर रुमकडून गरज पडल्यास खाटा उपलब्ध करून उपचार करता येतील.