मुंबई - कोरोना मुक्तीच्या दिशेने उद्या भारत पहिले पाऊल टाकणार आहे आणि हे पाऊल म्हणजे कोरोना लसीकरण. मागील दहा महिने तमाम भारतीय ज्या दिवसाची वाट पाहत होते तो दिवस अखेर उद्या उजाडणार आहे. उद्या संपूर्ण भारतात लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. तर या मोहिमेसाठी आता मुंबई आणि मुंबई महागनगर पालिका ही सज्ज झाली आहे. मुंबईसोबत राज्यातील पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूरसह सर्वच जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. मुंबईत 9 लसीकरण केंद्रावर लसीकरण होणार आहे. यातीलच एक महत्त्वाचे केंद्र म्हणजे बीकेसी कोविड सेंटर. कारण या सेंटरमध्ये 15 युनिट असून येथे सर्वाधिक लसीकरण होणार आहे. तर उद्या याच सेंटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत. त्यानुसार उद्याच्या या महत्त्वाच्या टप्प्यासाठी बीकेसी कोविड सेंटर पूर्णतः सज्ज झाले आहे. दुपारी 4च्या सुमारास लशीचे 4 हजार डोस सेंटरमध्ये दाखल झाले आहेत, अशी माहिती डॉ. राजेश डेरे, अधिष्ठाता, बीकेसी कोविड सेंटर यांनी खास 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे. त
लसीकरण मोहिमेतील एकमेव कोविड सेंटर
पालिकेने सुरुवातीला पहिल्या टप्प्यासाठी केवळ आपल्या 8 रुग्णालयातच लसीकरण केंद्र तयार करण्याचा निर्णय घेतला होता. पण पुढे कोविड सेंटरला ही यात समाविष्ट करण्यात आले. पण 16 जानेवारीला लसीकरणाला सुरुवात होणार म्हणताना केवळ एकमेव बीकेसी कोविड सेंटरमधीलच लसीकरण केंद्र तयार झाले होते. तर येथील टीम ही प्रशिक्षित झाली होती. तेव्हा मुंबईतील एकमेव बीकेसी कोविड सेंटरचा समावेश पहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेसाठी झाला आहे. दरम्यान, या सेंटरमध्ये 15 युनिट तयार करण्यात आले आहे. मुंबईतल्या 72 युनिटपैकी 15 युनिट एकट्या या सेंटरमध्ये आहेत. तेव्हा येथे सर्वाधिक लसीकरण केले जाणार आहे.
100हून अधिक जणांची टीम तयार
या सेंटरची पहिल्या टप्प्यासाठी निवड झाल्याबरोबर येथील 100हून अधिक कर्मचाऱ्यांना पालिकेकडून प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यानुसार उद्या लसीकरणासाठी प्रशिक्षित असे 36 डॉक्टर, 36 नर्स आणि 40 वॉर्डबॉय अशी टीम कार्यरत असणार आहे, असे डॉ. डेरे यांनी सांगितले आहे. तर उद्या 10 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होईल. त्यानंतर प्रत्यक्षात कोविन अॅपवर नोंदणी झालेल्या कोविड योद्ध्यांना लस देण्यास सुरुवात होईल. तर या कोरोना योद्ध्यांना लस दिल्यानंतर काही दुष्परिणाम झाले वा काही त्रास झाला तर त्यांना त्वरित उपचार मिळावेत, यासाठी 9 आयसीयू बेड ही सज्ज ठेवण्यात आले असल्याचेही डॉ. डेरे यांनी सांगितले आहे.
4 डोस दाखल, 9 पोलिसांचा लसीवर वॉच
उद्यापासून लसीकरणाला सुरवात होणार असल्याने पालिकेने आज दुपारीच सर्व केंद्रावर लसीचे डोस पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार बीकेसी कोविड सेंटरला दुपारी 4 वाजता लसीचे 4 हजार डोस पोलीस बंदोबस्त दाखल झाली आहे. लसीकरण केंद्रातील कोल्ड स्टोरेज रूममध्ये हे डोसेस ठेवण्यात आले आहे. तर या लसींवर 9 पोलीस वॉच ठेवून आहेत.