मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका परदेशी अमली पदार्थ तस्कराला तब्बल 4 किलो हेरॉइनसह अटक करण्यात आलेली आहे. झांबिया या देशाचे नागरिकत्व असलेला केनित मुलावा असे या अटक करण्यात आलेल्या अमली पदार्थ तस्कराचे नाव आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळालेल्या गुप्त माहितीवरून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. या ठिकाणी झांबियन नागरिकत्व असलेल्या अमली पदार्थ तस्करी केनित मुलावा हा त्याची ट्रॉली बॅग घेण्यासाठी आला असता एनसीबीने आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या बॅगची तपासणी केली. त्यामध्ये लपवून ठेवण्यात आलेले चार किलो हेरॉइन हस्तगत करण्यात आलेले आहेत. गेल्या 2 दिवसापासून या अमली पदार्थ तस्कराच्या मागावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी होते. ही कारवाई करताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा गणवेश घालून या आरोपीस अटक केलेले आहे. अटक करण्यात आलेला अमली पदार्थ तस्कर हा झांबिया लष्करातून सेवानिवृत्त झालेला आहे. यासंदर्भात एनसीबी अधिक तपास करत आहे.