मुंबई - शहरातील जसलोक रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या 16 नर्सेसला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याचसोबत पाच डॉक्टर्स देखील 'पॉझिटिव्ह' आहेत. यामुळे एकाच रुग्णालयातील 21 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
बातमी मिळताच सर्वांना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. यामुळे शहरात एकूण 2509 रुग्ण झाले असून 125 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 281 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील रुग्णांवर उपचार करणाऱ्या केईएम रुग्णालयतील डॉक्टर, नर्स, आया आदींना कोरोनाची लागण झाली आहे. वोकहार्ड, फोर्टिस, सुश्रुषा, सैफी, साई आदी हॉस्पिटलमध्येही आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे.
जसलोक रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी तिघांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या माध्यमातून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. आता यामध्ये नव्याने 16 नर्स आणि 5 डॉक्टरांचा समावेश झालाय. सध्या या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू असून त्यासंबंधित माहिती मिळवण्यात येत आहे.