मुंबई - मुंबईत 16 जानेवारीपासून महापालिका, सरकारी, खासगी रुग्णालय तसेच कोविड सेंटरमध्ये कोरोना विषाणूवरील लस दिली जात आहे. केंद्र सरकारने लसीकरण करण्यासाठी खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात येईल असे स्पष्ट केले होते. त्यानुसार केंद्र सरकारने पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत येणाऱ्या 29 रुग्णालयांना लसीकरणाची मान्यता दिली आहे. या रुग्णालयांमधून नागरिकांना 250 रुपये शुल्क देऊन लसीकरण करून घेता येईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
29 रुग्णालयांना मान्यता
मुंबईत मागील वर्षाच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक आणि 45 ते 59 वर्षांमधील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिका, सरकारी रुग्णालय, कोविड सेंटर येथे लस मोफत दिली जाणार आहे. तर खासगी रुग्णालयात 250 रुपयांना ही लस दिली जात आहे. मुंबईत पहिल्याच दिवशी 3 खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी दिली होती. आता ज्या खासगी रुग्णालयात 200 खाटांची क्षमता आहे, व जी रुग्णालये पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना देतात अशा 29 रुग्णालयांमध्ये लसीकरणाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.
लसीकरणासाठी या रुग्णालयांना परवानगी
मुंबईमधील विक्रोळी येथील शुश्रूषा, के जे सोमय्या हॉस्पिटल, नानावटी रुग्णालय, वोकहार्ट रुग्णालय, हिंदुजा रुग्णालय, सैफी रुग्णालय, होली फॅमिली रुग्णालय, मसिना रुग्णालय, एस. एल. रहेजा रुग्णालय, लिलावती रुग्णालय, गुरुनानक रुग्णालय, बॉम्बे रुग्णालय आदी 29 रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. या रुग्णालयात 250 रुपये शुल्क भरून लसीकरण करता येणार आहे.
आतापर्यंतचे लसीकरण -
मुंबईत 16 जानेवारीपासून आज 2 मार्चपर्यंत एकूण 2 लाख 41 हजार 747 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्यात 2 लाख 15 हजार 207 लाभार्थ्यांना पहिला तर 26 हजार 540 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
एकूण लसीकरण -
आरोग्य कर्मचारी - 1,33,769
फ्रंटलाईन वर्कर - 99,143
45 वर्षावरील आजारी - 850
60 वर्षावरील - 7,982
एकूण - 2,41,747