मुंबई - देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. यातील अनेक कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची गरज असल्याने देशभरात ऑक्सिजनची टंचाई जाणवत आहे. ऑक्सिजनची टंचाई दूर करण्यासाठी भारतीय रेल्वेने आतापर्यत देशभरात २८४ ऑक्सिजन एक्सप्रेस चालविण्यात आल्या आहेत. यातून १ हजार १४१ टँकरद्वारे १८ हजार ९८० मेट्रिक टन ऑक्सिजनची वाहतूक करण्यात आली आहे.
१८ हजार ९८० मेट्रिक टन ऑक्सिजनची वाहतूक -
भारतीय रेल्वेद्वारे महामारीच्या काळात अत्यावश्यक सेवांचा पुरवठा केला जात आहे. यासह आता ऑक्सिजन एक्स्प्रेसद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा राज्याच्या मागणीनुसार केला जात आहे. देशभरात एकूण आतापर्यत २८४ ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविण्यात आल्या आहेत. यामधून एकूण १८ हजार ९८० मेट्रीक टन एलएमओची वाहतूक केली आहे. याद्वारे महाराष्ट्रात ६१४ मेट्रिक टन ऑक्सिजन, उत्तर प्रदेशमध्ये ३ हजार ७३१ मेट्रिक टन, मध्य प्रदेशमध्ये ६५६ मेट्रिक टन, हरियाणामध्ये १ हजार ९६७ मेट्रिक टन, तेलंगणात १ हजार ३१२ मेट्रिक टन, राजस्थानात ९८ मेट्रिक टन, कर्नाटकात १ हजार ६५३ मेट्रिक टन, उत्तराखंडमध्ये ३२० मेट्रिक टन, तामिळनाडूमध्ये १ हजार ५५० मेट्रिक टन, आंध्र प्रदेशमध्ये १ हजार १९० मेट्रिक टन, पंजाबमध्ये २२५ मेट्रिक टन, केरळमध्ये ३८० मेट्रिक टन आणि दिल्लीमध्ये ५ हजार ७७ मेट्रिक टनांपेक्षा अधिक ऑक्सिजन पोहोचवण्यात आला आहे.
दररोज जवळपास १ हजार १९५ मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा -
भारतीय रेल्वेने देशभरात २८४ ऑक्सिजन एक्सप्रेस चालविण्यात आल्या आहे. यातून सर्वाधिक ऑक्सिजनच्या पुरवठा दिल्लीला करण्यात आलेला आहे. आतापर्यत ऑक्सिजन एक्सप्रेसमार्फत दिल्लीमध्ये ५ हजार ७७ मेट्रिक टनांपेक्षा अधिक ऑक्सिजन पोहोचवण्यात आला आहे. भारतीय रेल्वेने दक्षिणेकडील राज्यांमध्ये, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये मेडिकल ऑक्सिजनची आतापर्यत १ हजार मेट्रिक टन पेक्षा जास्त पुरवठा केला आहे. भारतीय रेल्वेत पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस हे महाराष्ट्र्रतुन सुरु झाली होता. २४ एप्रिल रोजी महाराष्ट्रात १२४ मेट्रिक टन ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम केले आहे. त्यानंतर, राज्यांच्या मागणीनुसार प्रत्येक राज्यात ऑक्सिजन पुरविला जात आहे. सध्या देशभरात ऑक्सिजन एक्स्प्रेसकडून दररोज जवळपास १ हजार १९५ मेट्रीक टन द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
ऑक्सिजन वाहतुकीत पश्चिम रेल्वेचा विक्रम -
पश्चिम रेल्वेने एका दिवसात २५ टॅंकरद्वारे ४६८ टन द्रव रुप ऑक्सिजनची वाहतूक केली आहे. एका दिवसातील ऑक्सिजनची सर्वाधिक वाहतूक केल्याचे पश्चिम रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले आहे. २४ मे २०२१ रोजी पश्चिम रेल्वेने देशभरात ५ ऑक्सिजन एक्स्प्रेसद्वारे २५ टॅंकरच्या साहाय्याने 467.60 टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. या पाच ऑक्सिजन एक्स्प्रेस बंगळूरू, दिल्ली येथे नेण्यात आल्या आहेत. एका दिवसात सर्वाधिक ऑक्सिजनची वाहतूक करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. पश्चिम रेल्वेने मागील एका महिन्यात 54 ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविल्या आहेत. यामधून सुमारे २५५ टॅंकरद्वारे ४ हजार ७७३ मेट्रिक टन ऑक्सिजनची वाहतूक करण्यात आली आहे.