मुंबई: अल्पवयीन आठ वर्षांच्या चिमूरडीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो कोर्टाने 25 वर्षीय रिक्षा चालकाला 10 वर्षांची सक्तमजुरी कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीला 17 हजाराचा दंड देखील ठोठावला आहे. आरोपीने 2015 मध्ये पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणात सांताक्रुज पोलीस स्टेशनमध्ये पीडित मुलीच्या आईने गुन्हा दाखल केला होता. नुकतीच न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली आहे.
घटनेपूर्वी दोन महिने हा व्यक्ती मुलीच्या शेजारीच राहायला होता. त्याने तिला चॉकलेट देण्याचे आमिष देऊन स्मशानाजवळील झुडपात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. स्मशानभूमीच्या चौकीदाराने मित्रासोबत गप्पा मारत असताना आरोपीला पीडितेला झुडपात घेऊन जाताना पाहिले होते. कोर्टात साक्ष दिली होती. आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असताना मुलाला नग्न अवस्थेत कसे पाहिले हे त्याने सांगितले होते. त्यानंतर त्यांनी आरडा ओरडा केला ज्यानंतर आरोपीला पकडण्यात आले होते.
आरोपीच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की मुलीच्या वडिलांशी त्याचे भांडण झाले होते. तो मद्यपी असल्याचा दावा करत असल्याने बदला म्हणून ही तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, त्याचा बचाव फेटाळताना न्यायालयाने म्हटले की आरोपीने त्याच्या समर्थनार्थ कोणताही पुरावा आणला नाही. न्यायालयाने आरोपीला 17 हजाराचा दंड ठोठावला आहे. त्यातून पीडित तरुणीला 10 हजार रुपये देण्यात यावी असे देखील न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.