मुंबई - महानगरपालिकेच्या भायखळा येथील राणीबाग म्हणजेच वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयावर (243 crore spent on Rani Bagh in the last 4 years) २०१८ ते २०२१ या गेल्या ४ वर्षात २४३.६५ कोटी रुपये खर्च केला आहे. आरटीआयमधून ही माहिती समोर आली आहे. प्राणीसंग्रहालयातील पेंग्विन, वाघ किंवा सिंह सामान्य मुंबईकरांपेक्षा चांगले जीवन जगत आहेत असे यावरून दिसून येत असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी सांगितले.
असा झाला राणीबागेवर खर्च - 'द यंग व्हिसलब्लोअर्स फाउंडेशन' चे संयोजक जितेंद्र घाडगे यांनी राणीबागेवर करण्यात आलेल्या खर्चाची माहिती मागवली होती. त्यावर राणीबागेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील एंट्री प्लाझा, अंतर्गत पॉकेट गार्डन, सार्वजनिक सुविधा, सीसीटीव्ही बसवणे, इंटरप्रिटेशन सेंटर, पेंग्विन प्रदर्शन, तृणभक्षकांसाठी क्वारंटाईन, प्राणीसंग्रहालय, किचन कॉम्प्लेक्स, हेरिटेज स्ट्रक्चरची जीर्णोद्धार यासाठी तब्बल ९५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. फेज २ मध्ये १० पिंजऱ्यांवर ६२.९१ कोटी रुपये खर्च करण्यात आले. ज्यात लांडगा, अस्वल, मांजरीचे कॉम्प्लेक्स, कोल्हा, तरस , बिबट्या, मगरिंचे, पक्षांचे जाळं, कासवांचे तलाव आहे. टप्पा २ मधील निविदा २ मध्ये वाघ, सिंह, सांबर आणि भुंकणारे हरण, नीलगाय, चार शिंग मृग, दलदल हरण, काळवीट आणि पक्षांचे जाळे यासाठी ५७.११ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पेंग्विनच्या देखभालीसाठी गेल्या ४ वर्षांत एकूण १९.११ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. प्राणिसंग्रहालयातील उद्यानांच्या देखभालीसाठी बीएमसीने गेल्या ४ वर्षांत तब्बल ९.५२ कोटी खर्च केले आहेत.
मुंबईकरांपेक्षा प्राणी चांगले जीवन जगतात - प्राणीसंग्रहालयातील पेंग्विन, वाघ किंवा सिंह सामान्य मुंबईकरांपेक्षा चांगले जीवन जगत आहेत. प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या निवासांची किंमत प्रत्येकी ५ ते ९ कोटी आहे. सामान्य मुंबईकरांनी भरलेल्या करातुन हा खर्च केला आहे. याउलट सामान्य मुंबईकर मात्र मुंबईत दहा बाय दहा घर घेण्याचे फक्त स्वप्नच पाहू शकतो. आधी आपल्या जवळचा कॉन्ट्रॅक्टरला टेंडर मिळून द्यायचं, नंतर त्याच कामामध्ये अधिक खर्च वाढवायचा हे मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या टेंडरच समीकरण झाले आहे. 'कॉस्ट एस्केलेशन' ही बीएमसीवर सत्ता गाजवणाऱ्या भ्रष्ट नागरी अधिकारी, कंत्राटदार आणि राजकारण्यांची खेळी आहे. मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीची लूट करताना या भ्रष्टाचाऱ्यांना कोणतीही भीती किंवा मर्यादा दिसून येत नाही असे घाडगे म्हणाले.