मुंबई - राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. याचा फटका कोरोनाशी दोन हात करणाऱ्या मुंबई पोलिसांना सर्वाधिक बसला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुंबई पोलीस दलातील २३० जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत ही सर्वाधिक संख्या असून यामध्ये कोरोनापेक्षा इतर आजाराने मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांची संख्या अधिक आहे.
२०१८, २०१९ आणि २०२० या तीन वर्षात सर्वाधिक २३० मृत्यू हे २०२० मध्ये झाले असून यापैकी ९५ जण कोरोनाने तर १३५ पोलीस इतर आजाराने मृत्यूमुखी पडले आहेत. कोरोनाचा संसर्ग नसताना म्हणजे २०१८ मध्ये १२९ तर २०१९ मध्ये १४४ पोलिसांचे वेगवेगळ्या आजाराने निधन झाले आहे. २०२० मध्ये ४ पोलिसांनी आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपविले आहे.
मुंबई पोलीस दलात ६७३७ कमी मनुष्यबळ -
राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत मनुष्यबळ अधिक लागते. पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक यासाठी मंजूर पदसंख्या ४० हजार ४७० इतकी आहे. मात्र प्रत्यक्षात मुंबई पोलीस दलात ६७३७ कमी म्हणजेच ३३७३३ पोलीस कार्यरत आहेत.
पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची मंजूर पदे ५५९० असून सध्या मुंबई पोलीस दलात ३८८४ अधिकारी कार्यरत आहेत. १७०६ अधिकाऱ्यांची मुंबई पोलीस दलात कमतरता आहे. माहितीच्या आधाराखाली विहार दुबे यांनी मागवलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.