मुंबई - विनोबा भावे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 22 वर्षाच्या तरुणावर अनैसर्गिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 08 डिसेंबरला संबंधित प्रकार घडला असून याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामधील एक आरोपी अल्पवयीन असून त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
पीडित तरुणाचे इन्स्टाग्रामवर खाते आहे. त्यावर त्याने स्वत:चे काही फोटो अपलोड केले होते. ते फोटो पाहुन आरोपींनी त्याच्याशी ओळख निर्माण केली होती. त्यानंतर या तरुणाला विनोबा भावे नगर परिसरात कबाब सेंटरवर काही तरुण भेटले. या तरुणांनी त्याचाशी सोशल मीडियावरून ओळख काढून सोबत येण्यास सांगितले. हे तरुण ओळखीचे असल्यासारखे वाटल्याने पीडित त्यांच्यासोबत दुचाकीवरून विद्याविहार येथील निळकंठ बिजनेस पार्कजवळ आला. यानंतर आरोपींनी पीडित तरुणाला जबरदस्तीने चारचाकीत बसवले.
हेही वाचा :समलैंगिकता विषयावरील 'शीर कुर्मा' चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित
यावेळेस संबंधित चारचाकीत आणखी एक व्यक्ती उपस्थित होती. या तिघांनी पीडित तरुणावर आळीपाळीने अनैसर्गिक संभोग केला. यानंतर या कारमध्ये चौथा आरोपी आला; आणि त्याने गाडी चालवण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर पीडित पुरुषाला या चौघांनी मारहाण करून त्याच्या जवळील मोबाईल, क्रेडिट कार्ड तसेच दोन हजार रुपये काढून घेतले. काही अंतर कापल्यानंतर त्यांनी त्याला गाडी बाहेर ढकलून दिले.
पीडित पुरुषाने सुटका झाल्यानंतर तत्काळ शंभर क्रमांकावर संपर्क साधून घडलेल्या प्रकारची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या संदर्भात विनोबा भावे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी केवळ 24 तासात चार आरोपींना कुर्ला व घाटकोपरमधून अटक केली. गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर 16 डिसेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.