मुंबई - मुंबई महापालिकेने १६ जानेवारीपासून सुरू केलेल्या लसीकरणाचा पहिला आणि दुसरा टप्पा वेगाने सुरू आहे. लसीकरणाचा आणखी वेग वाढावा यासाठी खासगी रुग्णालयांनाही परवानगी मिळणार आहे. येत्या सोमवारपासून याची सुरुवात होणार आहे. पालिकेने २० खासगी रुग्णालयांना व त्यांच्या कर्मचाऱ्यांना लस देण्याची परवानगी दिली आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
सोमवारपासून खासगी रुग्णालयात लसीकरण -
मुंबईत कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यापासून सर्वसामान्यांचे लसीकरण सुरू होणार आहे. या टप्प्यात ५० वर्षावरील ज्येष्ठ आणि दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांना लस देण्यात येईल. त्यानंतर १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस दिली जाणार आहे. त्यामुळे लसीकरणाच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे. या लसीकरणासाठी पालिकेने तयारी सुरु केली असून यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, खासगी रुग्णालयांनी लसीकरणासाठी परवानगी देण्याची विनंती केली होती. येत्या सोमवारपासून खासगी रुग्णालयांना सुरुवातीला फक्त त्यांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. १ मार्चपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.
पालिका खासगी रुग्णालयांना लस पुरवणार -
खासगी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना मुंबई महापालिका लस पुरवणार आहे. सिरम इन्स्टि्यट्यूटकडून राज्य सरकार आणि महापालिकेला लसी मोफत मिळाल्या आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांनाही या लसी पालिका मोफत देणार आहे. मात्र, लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या सुविधा आणि यंत्रणा या रुग्णालयांनी स्वतः उभ्या करायच्या आहेत, अशी माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.