मुंबई - रेल्वेने उपनगरीय आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सतत प्रवाशांकडून अलार्म चेन पुलिंग होत असल्याने रेल्वेची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या २० दिवसांत मध्य रेल्वे मार्गावर १५७ अलार्म चेन पुलिंगच्या घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये १०८ प्रवाशांवर रेल्वेकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.
४७ हजार २०० रुपयांचा दंड - आपत्कालीन परिस्थिती रेल्वे गाडी थांबविण्यासाठी रेल्वेने उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मात्र, प्रवासी अलार्म चेन पुलिंगचा वापर स्थानकात उशीरा पोहोचणे, मधल्या स्थानकांवर उतरणे/ चढणे इत्यादी शुल्लक कारणांसाठी करताना निदर्शनात येत आहेत. त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावरच मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. मुंबई विभागासारख्या उपनगरीय मार्गावर अलार्म चेन पुलिंगचा वापर केला तर मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरी गाड्या उशिराने धावतात. त्याच्या उपनगरीय लोकल सेवेचा वेळापत्रकारवर पडून प्रवाशांची चांगलीच गैरसोय होते. शुल्लक कारणांसाठी अलार्म चेन पुलिंग करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वेने मोठी कारवाई केली आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभाग १ एप्रिल २०२२ ते २० एप्रिल २०२२ या कालावधीत अलार्म चेन पुलींगच्या गैरवापराची १५७ प्रकरणे नोंदवली गेली. यापैकी सुमारे १०८ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ४७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रेल्वेचे प्रवाशांना आवाहन - अनावश्यक परिस्थितीत अलार्म चेन पुलींग करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम 141 नुसार दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे अनावश्यक / गैरवाजवी कारणांसाठी अलार्म चेन पुलींगचा वापर करू नयेत असे आवाहन मध्य रेल्वेने प्रवाशांना केले आहेत. प्रवाशांनी त्यांच्या संबंधित गाड्या सुटण्याच्या किमान ३० मिनिटे आधी टर्मिनस/स्टेशनवर पोहोचण्याचे आणि मर्यादित सामान घेऊन जावेत. प्रवाशांना बॅटरीवर चालणाऱ्या कारच्या सेवांचाही वापर करता येईल किंवा स्टेशन व्यवस्थापक कार्यालयात उपलब्ध व्हीलचेअरचा वापर करून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती इच्छित डब्यापर्यंत पोहोचू शकतात जेणेकरून गाड्यांमध्ये चढणे सुरळीतपणे आणि वेळेत करता येईल, त्यामुळे अनावश्यक कारणांसाठी अलार्म चेन पुलिंगचा वापर टाळता येईल अशी माहितीही मध्य रेल्वेने दिली आहे.