मुंबई - राज्याच्या राजकारणात घोडेबाजाराला सुरुवात जरी झाली नसली तरी, त्या दिशेने पाऊले पडू लागली असल्याची बोचरी टीका शिवसेनेने 'सामना' च्या अग्रलेखातून भाजपवर केली आहे. राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणे हा त्यातलाच एक भाग असून, सत्तेत आम्ही नाही तर कोणीच नाही, हा अहंकाराचा दर्प निकालानंतर दरवळू लागला असून तो राज्याच्या हितासाठी चांगला नसल्याचा टोला अग्रलेखातून भाजपला मारला आहे.
हेही वाचा - राणे पुन्हा तोंडघशी; भाजपच्या सत्ता स्थापनेबाबतचे त्यांचे मत व्यक्तिगत - मुनगंटीवार
दरम्यान, मंगळवारी राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेनेची भुमिका आजच्या (बुधवार) अग्रलेखातून स्पष्ट करण्यात आली आहे. राज्याच्या राजकारण हे घोडेबाजाराच्या दिशेने चालले असल्याचे सांगते भाजपला सत्तेचा अहंकार असून तो चांगला नसून जनतेने दिलेल्या जनादेशाचे पालन होत नाही. त्यामुळे तो जनतेचा अपमान असल्याचे या अग्रलेखात म्हटले आहे. तसेच दोन्ही पक्षांना दिलेला जनादेश हा जनतेचा विश्वासघात करणारा असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा - राज्यात भाजपविरहीत सत्ता येणार या भितीने राष्ट्रपती राजवटीचा निर्णय - बाळासाहेब थोरात
काय आहे अग्रलेखात?
तत्ववादी विचार मांडणाऱयांनी समजान घेतले पाहिजे की, हा जनादेश 'दोघांना' मिळाला आहे. दोघांनी मिळून ज्या भूमिकांवर शिक्कामोर्तब झाला त्याला हा जनादेश मिळाला आहे. मात्र, ते मानायला तयार नव्हते म्हणूनच महाराष्ट्राच्या मातीचा स्वाभिमान राखण्यासाठी आम्हाला स्वतंत्र पावले उचलावी लागली. याचा दोष कोणी आम्हाला का द्यावा? भाजप हा तत्वाचा, नीतिमत्तेचा, संस्काराने वागणारा पक्ष आहे असे म्हणतात. पण, महाराष्ट्राच्या बाबतीत ही तत्वे आणि संस्कार त्यांनी पाळायला हवे होते्. भाजप विरोधी पक्षात बसायला तयार आहे. याचा अर्थ ते काँग्रेस, राष्ट्रवादीला पाठबळ देण्यास तयार आहेत. ठरल्याप्रमाणे भाजपने शब्द पाळला असता तर परिस्थिती इतक्या धरास गेली नसती. शिवसेनेसोबत जे ठरले ते देणार नाही, भले आम्ही विरोधी बाकड्यांवर बसू हा डावपेचाचा भाग नसून शिवसेनेस पाण्यात पाहण्याचा दुर्योधनी कावा आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्तास्थापन करून होऊ द्यायची नाही व राजभवनाच्या झाडाखाली बसून पत्ते पिसत बसायचे हा सर्व खेळ महाराष्ट्राची जनता बघत आहे.
भाजपबरोबर अमृताच्या पेल्यातील विषाचा घोट आम्ही रिचवल्यावर आता महाराष्ट्रातील अस्थिरता संपवण्यासाठी 'नीळकंठ' होण्यास आम्ही तयार आहोत. राज्यातील जनतेला सत्य माहिती असल्यामुळे आम्ही एका विश्वासाने काही पाऊले टाकली आहेत.
राज्यपाल हे सत्ताधारी पक्षाचेच असतात, पण किमानपक्षी त्यांनी स्वतंत्र वृत्तीने वागावे व घटनेतील उद्देशांचे पालन करण्याची आणि कायद्याची बांधिलकी पाळण्याची शपथ विसरू नये एवढी अपेक्षा असते. पण सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळय़ात जास्त गोंधळ व भेसळ करीत आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात जो खेळ मांडला आहे त्यामुळे कुणाचा कंडू शमणार असेल तर त्याने जरूर खाजवत बसावे. शिवसेनेची पावले कोणत्या दिशेने पडत आहेत यावर टीका आणि टिप्पण्या करूद्यात.