ठाणे - महाराष्ट्र ( Maharashtra ) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२२ चा इयत्ता बारावीचा ( HSC ) निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यंदा ठाणे ( Thane ) जिल्ह्याचा निकाल ९२.६७ टक्के लागला असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली. यामध्ये कल्याण ( Kalyan) ग्रामीण क्षेत्रातील ९५.८० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात कल्याण ग्रामीण क्षेत्रातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
जिल्ह्यात ८८ हजार ४३१ विद्यार्थी उत्तीर्ण - यंदा ठाणे जिल्ह्यातील ९५,४२० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८८ हजार ४३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ५० हजार ४७७ मुलांपैकी ४६,२९६ मुले उत्तीर्ण झाली. तर ४४,९४३ मुलींपैकी ४२,१३५ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांचा ९१.७१ टक्के निकाल लागला तर मुलींचा ९३.७५ टक्के लागला आहे. त्याचबरोबर कोकण विभागात रायगड पाठोपाठ ठाणे जिल्हाचा सर्वाधिक निकाल लागला आहे.
कल्याण ग्रामीण क्षेत्र अव्वल - ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ-बदलापूर, भिवंडी, मुरबाड, शहापूर, ठाणे मनपा, नवी मुंबई मनपा, मीरा भाईंदर मनपा, कल्याण डोंबिवली मनपा, उल्हासनगर मनपा, भिवंडी मनपा आदी क्षेत्रातील विद्यार्थी बारावी परीक्षेला बसले होते. यामध्ये कल्याण ग्रामीण क्षेत्रातील ९५.८० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात कल्याण ग्रामीण क्षेत्रातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी अभिनंदन केले.
हेही वाचा - बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचीच बाजी तर कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल