मुंबई - दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अकरावी प्रवेशासाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षा (CET) २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते १ या वेळात होणार आहे. ही परीक्षा मंडळाशी संलग्न ज्युनिअर कॉलेजांमध्ये होणार असून परीक्षा ऐच्छिक असल्याचे मंडळाने स्पष्ट केले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द केली आहे. तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल शुक्रवारी जाहीर होणार आहे. तसेच सोमवारी मंडळाने अकरावी प्रवेश परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.
हेही वाचा-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी ओबीसी आरक्षण हवं - देवेंद्र फडणवीस
२६ जुलै अर्ज भरण्याची अंतिम मुदत-
यंदा अकरावी प्रवेशासाठी प्रथमच प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऐच्छिक असणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची सुरुवात २० जुलै २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता सुरू होणार आहे. विद्यार्थी www.cet.mh-ssc.ac.in या वेबसाइटवरून २६ जुलैपर्यंत अर्ज भरू शकणार आहेत. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. मात्र सीबीएसई, आयसीएसई व अन्य आंतरराष्ट्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाकडून निश्चित केलेले १७८ रुपये भरावे लागणार आहे.
१०० गुणांची अशी होणार परीक्षा-
प्रवेश परीक्षा इंग्रजी, गणित भाग १ आणि भाग २, विज्ञान आणि समाजशास्त्र या चार विषयांना प्रत्येकी २५ गुणांची म्हणजे १०० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजी, मराठी, गुजराती, कन्नड, उर्दू, सिंधी, तेलुगु, हिंदी या आठ माध्यमांपैकी एक किंवा दोन माध्यमातील प्रश्नांचा समावेश असलेली प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे. ही परीक्षा बहुपर्यायी स्वरुपाने घेण्यात येणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. या विषयांमधील कोणत्या अभ्याासक्रमावर प्रश्न येणार आहेत हेही मंडळाने जाहीर केले आहे.
सीईटी परीक्षा पास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशात प्राधान्य-
सीईटी परीक्षा पास करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. सीईटी परीक्षेसाठी दोन तासांचा वेळ विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचेही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतेच सांगितले आहे.