मुंबई- दहीहंडी फोडताना लावण्यात येणाऱ्या थरांमुळे आतापर्यंत 140 गोविंदा जखमी झाले आहेत. या जखमी गोविंदांवर पालिकेच्या आणि राज्य सरकारच्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी 140 गोविंदांपैकी 103 गोविंदांवर उपाचार करून घरी सोडण्यात आले आहे, तर 32 गोविंदांवर अद्याप विविध रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.
महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे मोठ्या आयोजकांच्या दहीहंड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र छोट्या दहीहंड्या मुंबईत अनेक ठिकाणी लावण्यात आल्या. मोठ्या हंड्या नसल्याने यावेळी जखमी गोविंदाची संख्या कमी असेल, असा अंदाज लावण्यात येत होता. मात्र हा अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला आहे. मुंबईत हंड्या फोडताना रात्री 11 पर्यंत 140 गोविंदा जखमी झाले आहेत.
नायर रुग्णालयात १३ जखमी गोविंदा दाखल झाले. त्यापैकी ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून २ जण उपचार घेत आहेत. केईएम रुग्णालयात २७ गोविंदा दाखल झाले, त्यापैकी २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ६ जण उपचार घेत आहेत. सायन रुग्णालयात १२ गोविंदा दाखल झाले. त्यापैकी ५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ७ जणांवर उपचार सुरु आहेत. जेजे रुग्णालयात १ गोविंदा दाखल झाला होता. त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. जसलोक रुग्णालयामध्ये एक गोविंदा दाखल झाला. त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. हिंदुजा रुग्णालयात एका गोविंदावर उपचार सुरु आहेत. सेंट जॉर्ज रुग्णालयातून ६ गोविंदावर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जीटी रुग्णालयात एक गोविंदा उपचार घेत आहे. बॉम्बे हॉस्पिटलमधून एका गोविंदावर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गोवंडी शताब्दी रुग्णालयात २ गोविंदा उपचार घेत आहेत. एम टी अग्रवाल रुग्णालयातून एका गोविंदावर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला. राजावाडी रुग्णालयात १८ गोविंदा दाखल झाले. त्यापैकी १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून २ जण उपचार घेत आहेत. बांद्रा भाभा रुग्णालयात १२ गोविंदा दाखल झाले, त्यांच्यावर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला. कूपर रुग्णालयात ११ गोविंदा दाखल झाले. त्यापैकी १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकावर उपचार सुरु आहेत. ट्रॉमा केअर रुग्णालयात ५ गोविंदा दाखल झाले. त्यापैकी ३ जणांना डिस्चार्ज देण्यात असून २ जण उपचार घेत आहेत. व्ही. एन. देसाई रुग्णालयात एका गोविंदावर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कांदिवली शताब्दी रुग्णालयात ६ गोविंदा दाखल झाले. त्यापैकी ४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून २ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली आहे.