मुंबई - गेल्या दोन महिन्यांपासून संपावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करून देखील कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटी महामंडळाने निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ ( ST Employees Dismissed ) करण्याचे सत्र सुरू केले आहे. आज, महामंडळाने ११६ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून, आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ७१९ वर पोहचली आहे. याशिवाय आतापर्यंत महामंडळाने १० हजार ७६४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
हेही वाचा - मुंबईत कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ, गर्दी टाळण्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आवाहन
1 हजार ५३९ कर्मचाऱ्यांना बाजवली नोटीस -
एसटी महामंडळ विलिनीकरणाच्या मागणीवरून सुरू असलेला संप चांगलाच चिघळला असून दोन महिने होऊन सुद्धा एसटीचा संप सुरूच आहे. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. एसटी कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. महामंडळाने आतपर्यंत राेजंदारीवरील अडीच हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली, असून १० हजार ७६४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. याशिवाय २ हजार ७९६ कर्मचाऱ्यांचा बदल्या केल्या आहेत. मात्र, निलंबनाच्या कारवाईनंतरही कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. निलंबित कामगारांना आतापर्यंत मंडळाकडून दोन वेळा संधी देण्यात आलेली होती. मात्र, संधी देऊन सुद्धा निलंबित कर्मचारी कामावर हजर झाले नाही. त्यामुळे, आता निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून देण्यास सुरुवात केली आहे. या महिन्यात १ हजार ५३९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून बजवण्यात आली आहे. तर, आज महामंडळाने ११६ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ७१९ वर पोहचली आहे.
८१ आगार संपामुळे बंदच -
एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यभरातील २५० आगारांपैकी १६९ आगार सुरू झाले आहेत. तर, ८१ आगार संपामुळे अजूनही बंद आहेत.
हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत एकाच दिवसात 3671 कोरोना रुग्णांची नोंद, आठव्यांदा शून्य मृत्यूची नोंद