मुंबई- आर्थिक गुन्हे शाखेकडून यशराज फिल्म्स विरोधात शंभर कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामुळे यशराज फिल्म्सचे आदित्य चोप्रा अडचणीत आले आहेत. दि इंडियन परफॉर्मिंग राईट सोसायटी लिमिटेड या कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापक शीतल मदनानी यांच्याकडून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीदरम्यान मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शंभर कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दि इंडियन परफॉर्मिंग राईट सोसायटी लिमिटेड व यशराज फिल्मच्या दरम्यान झालेल्या करारानुसार दि इंडियन राईट परफॉर्मिंग सोसायटी लिमिटेडच्या लेखक- कंपोजर यांना रॉयल्टी देण्याचा कायदेशीर करार करण्यात आलेला होता. मात्र, 2012 पासून नोव्हेंबर 2019 पर्यंत यशराज फिल्म्सकडून या संदर्भातील रॉयल्टीची रक्कम संबंधित व्यक्तींकडून घेण्यात आली होती. मात्र, ही रक्कम यशराज फिल्म्सकडून स्वतःजवळ ठेवण्यात आलेली होती. ही रक्कम इंडियन परफॉर्मिंग राईट सोसायटी लिमिटेडच्या लेखक व कंपोजरला देण्यात न आल्यामुळे या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.