मुंबई - अकरावी प्रवेशासाठी इन-हाउस कोटा आता १० टक्के असणार आहे. १० वी च्या विद्यार्थ्यांनी चिंता करु नये, अभ्यास नीट करुन परिक्षा द्यावी असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
पुढील वर्षी अकरावी प्रवेशासाठी एसईबीसीसाठी १६ टक्के आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण मिळणार आहे. आरक्षणाची टक्केवारी १०३ टक्क्यापर्यंत जाईल. अकरावीच्या खुल्या गटातील विद्यार्थ्यांना जागाच मिळणार नाही, असा अनावश्यक समज निर्माण केला जात असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.
ज्या शाळांमध्ये, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आतापर्यंत २० टक्के इन-हाऊस कोटा आहे, तो इन-हाऊस कोटा यंदापासून १० टक्के राखीव इतका करण्यात आला आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी सर्व आरक्षणानंतरही ७ टक्के जागा या खुल्या गटासाठी शिल्लक राहणार आहेत.