मुंबई - संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारला गेला तोच मुळी कष्टकरी, शेतकरी आणि गिरणी कामगारांच्या जिद्दीने. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी होऊ नये म्हणून १०७ हुतात्म्यांनी आपला बळी दिला आणि त्यांच्याच हौतात्म्यावर आज महाराष्ट्र दिमाखात उभा आहे. तर जाणून घेऊया या कणखर महाराष्ट्राचा इतिहास...
मुंबई इलाखा म्हणजे काय? - महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वी मुंबई इलाखा हा वेगळा प्रांत होता. ब्रिटिश काळात मराठी आणि गुजराती भाषिकांचा समावेश असलेल्या या मुंबई इलाख्यात आजच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचा समावेश होता. मुंबई शहर कोकणपट्टी तसेच गुजराती आणि कानडी प्रदेशाचा समावेशही मुंबई इलाख्यात करण्यात आला होता. मुंबईचा समावेश गुजरातमध्ये व्हावा, असा आग्रह तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी केला होता. त्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र परिषद जन्माला आली.
हेही वाचा - 1 May Maharashtra Day : महाराष्ट्र दिनानिमित्ताने जाणून घेऊया मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीची यशोगाथा
संयुक्त महाराष्ट्र परिषद? - संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी संयुक्त महाराष्ट्र परिषद 24 जुलै 1940 रोजी मुंबईत सर्वपक्षीय महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवण्यात आली. यामध्ये शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्राचा ठराव संमत करण्यात आला. गचकरण माडखोलकर हे या परिषदेचे सरचिटणीस होते. मात्र शंकरराव देव हे काँग्रेसचे नेते असल्याने ते फार काही करू शकणार नाहीत हे मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कॉम्रेड डांगे यांनी मांडले. काही काळातच ही परिषद निष्प्रभ झाली.
राज्य पुनर्रचना आयोगाची काय होती शिफारस? - केंद्राने स्थापन केलेल्या फाजल अली राज्य पुनर्रचना आयोगाच्या नुसार या समितीने 10 ऑक्टोबर 1955 रोजी आपला अहवाल सादर करीत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आणि गुजरात या मागण्या फेटाळल्या तर विदर्भाचे स्वतंत्र राज्य करावे असे सुचवण्यात आले. उरलेल्या मराठी आणि गुजराती भाषिकांचे संतुलित असे द्विभाषिक राज्य निर्माण करावे असे सुचवण्यात आले. त्यानंतर त्रिराज्य सूत्र राज्य पुनर्रचना आयोगाने मांडले असले तरी ते फेटाळून लावण्यात आले. काँग्रेसेतर सर्व पक्षांनी त्याचा विरोध केला. 21 नोव्हेंबर 1955 रोजी मुंबईत हरताळ पाळण्यात आला. या हरताळा दरम्यान आंदोलन तीव्र झाले आणि झालेल्या दंग्यात काही जणांना प्राण गमवावे लागले.
हेही वाचा - Maharashtra Day : महाराष्ट्रात विलीन होताना विदर्भाच्या कोणत्या अटी होत्या?; वाचा, काय होता 'नागपूर करार'
मुंबई केंद्रशासित प्रदेश - तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 16 जानेवारी 1956 रोजी मुंबई हा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषणा केली आणि नेहरूंच्या या वक्तव्यावर महाराष्ट्र पेटून उठला. महाराष्ट्रात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. 16 ते 22 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दंगे झाले. यात तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले. आंदोलनात हुतात्मा झालेले बहुतेक लोक हे चाकरमानी होते. नोकरीसाठी कोकणातून आणि महाराष्ट्राच्या इतर प्रांतातून मुंबईत आले होते. गिरणी कामगार होते. मात्र त्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आणि आपल्या प्राणांची बाजी लावली. १९५७ च्या निवडणुकीत काँग्रेसला काठावरचे बहुमत मिळाले. जनमानसाने द्विभाषिक मुंबई राज्य मान्य असल्याचा स्पष्ट संकेत निवडणुकीच्या माध्यमातून दिला. अखेर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाला यश आले आणि १९६० मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश यशवंतराव चव्हाण यांच्या हाती सोपवला. मुंबईतील हुतात्मा चौकात या 107 हुतात्म्यांच्या स्मरणार्थ स्तंभ उभारण्यात आला आहे. ज्या हुतात्म्यांनी आपले बलिदान देऊन महाराष्ट्राच्या निर्मितीत मोलाचा वाटा उचलला त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी १ मे महाराष्ट्र दिनी त्यांना आदरांजली वाहिली जाते आणि त्यांचे पुण्यस्मरण केले जाते.