मुंबई - मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. भारतरत्न मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, सुनील गावस्कर, संदीप पाटील, अजित वाडेकर, रोहित शर्मा अशे एका पेक्षा एक सरस क्रिकेटपटू या मुंबई नगरीतूनच निर्माण झाले. आज आयपीएल १५ च्या हंगामासाठी दुसऱ्या दिवशी मेगा ऑक्शनमध्ये ( IPL Mega Auction 2022 ) बोली लागत असताना मुंबईचा क्रिकेटर अजिंक्य रहाणे याचं लिलावामध्ये नाव कधी येईल याविषयी क्रिकेटप्रेमी मध्ये उत्सुकता ( Cricket Lovers In Mumbai ) होती. जेवणाच्या टेबलवर सुद्धा युवा क्रिकेटप्रेमी मोबाईलमध्ये आयपीएल मेगा ऑक्शन बघत अजिंक्य राहणेला कुठचा संघ, किती कोटीमध्ये घेतो याची उत्सुकतेने वाट बघत होते.
मुंबई क्रिकेटची पंढरी!
मुंबईकर आणि क्रिकेट यांचं प्रेम कधीच लपलेलं नाही आहे. मुंबईतील मोठमोठ्या मैदानापासून ते एखाद्या गल्लीमध्ये सुद्धा आजही क्रिकेटचे धडे गिरवले जात आहेत. याच मुंबईमध्ये निर्माण झालेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला जगाने क्रिकेटचा देव मानलं. त्याच मुंबई मध्ये अजिंक्य रहाणे हा क्रिकेटर सुद्धा निर्माण झाला. आयपीएलच्या १५ व्या हंगामासाठी काल जगभरातील क्रिकेटपटूंची बोली लावण्यात आली. परंतु या पहिल्या दिवशी मुंबईच्या अजिंक्य रहाणेला कुठल्याही संघाने समाविष्ट न केल्याने मुंबईकर क्रिकेट प्रेमीमध्ये मोठी नाराजी होती आणि ही नाराजी आज स्पष्टपणे त्यांच्या तोंडून बोलूनही दाखवली.
अजिंक्य रहाणेविषयी मुंबई क्रिकेटप्रेमींना चिंता!
रविवारच्या दिवशी सकाळची क्रिकेटची मॅच खेळून झाल्यानंतर जेव्हा नाश्त्यासाठी हे मुंबईकर एका हॉटेलमध्ये बसले त्या हॉटेलच्या टेबलवर सुद्धा मोबाईलमध्ये आयपीएल मेगा ऑक्शन बघत अजिंक्य रहाणेला कुठल्यातरी संघाने मोठ्या बोलीने घ्यावे हीच अपेक्षा व्यक्त करत होते. सध्या अजिंक्य रहाणे फॉर्ममध्ये नसला तरी या अगोदर त्याने बरेच विक्रम केले आहेत. शांत आणि अतिशय कूल माइंडेड असलेल्या अजिंक्य रहाणेला मागच्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सने घेतले होते. परंतु यंदाच्या हंगामामध्ये त्याच्यावर बोली न लागल्याने क्रिकेटप्रेमी थोडेसे नाराज झाले होते.अजिंक्य रहाणेचं ऑक्शनमध्ये काय होणार? त्याला कोणी खरेदीदार मिळणार का? असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडले होते. मागच्या काही दिवसांपासून मीडियामध्ये अजिंक्य रहाणेबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. कारण दक्षिण आफ्रिका दौऱ्यात फ्लॉप ठरल्यानंतर त्याचं करीयर संपलं अशी क्रिकेटच्या जाणकारांमध्ये चर्चा सुरु होती. त्याअनुषंगाने या युवा क्रिकेटपटूंना अजिंक्य रहाणे विषयी चिंता वाटत होती.
काल लागली होती ९७ खेळाडूंवर बोली
काल पहिल्या दिवशी एकूण ९७ खेळाडूंवर बोली लागली. यात ७४ खेळाडूंना विकत घेतलं. २३ खेळाडूंवर कोणीही बोली लावली नाही. लिलावात विकत घेतलेल्या ७४ खेळाडूंमध्ये २० परदेशी खेळाडू होते. कालच्या दिवसात इशान किशन, दीपक चाहर आणि श्रेयस अय्यर हे तिघे सर्वात महागडे खेळाडू ठरले होते. लिलावासाठी ६०० खेळाडूंची निवड झाली आहे. त्यामुळे आजही अनेक मोठ्या खेळाडूंवर बोली लागेल व त्यामध्ये अजिंक्य रहाणे यांचा समावेश नक्की असेल अशी अपेक्षा मुंबई क्रिकेटप्रेमींना होती.
अखेर केकेआरने १ कोटीला लावली अजिंक्यला बोली
अजिंक्यवर त्याच्या खेळावरुन बरीच टीका सुद्धा झाली आहे. आयपीएल ऑक्शनच्या दोन दिवसआधीच अजिंक्यने त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला उत्तर दिलं. बॅकस्टेज विथ बोरीया कार्यक्रमात त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल एक मोठा खुलासाही केला होता. “मैदानावर मी निर्णय घेतले, पण त्याचं श्रेय कोणी दुसराचं घेऊन गेला” अशी खंत त्याने बोलून दाखवली होती. अखेर मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला कोलकाता नाइट रायडर्सने विकत घेतलं. अजिंक्य रहाणेची बेस प्राइस १ कोटी रुपये होती. त्याला त्याच किंमतीला विकत ( KKR Bid On Ajinkya Rahane ) घेतलं. केकेआर वगळता अन्य कुठल्याही फ्रेंचायजीने रहाणेवर बोली लावण्यासाठी ऑक्शन पॅड उचललं नाही. त्याचा सध्याचा फॉर्म हेच त्यामागे कारण असावं. कारण अजिंक्यवर बोली न लावण्यामागे फ्रेंचायजींनी त्याच्या वयाचा सुद्धा विचार केला असेल. परंतु अखेर अजिंक्य रहाणेला संधी भेटल्याबद्दल मुंबई क्रिकेटप्रेमी मध्ये नक्कीच आनंदाचे वातावरण आहे.