लातूर - पाणीटंचाई, अपुरी जागा, संगोपणातील अडचणी अशा कारणांमुळे वृक्षरोपणाबाबत उदासीनता दिसून येते, परंतु लातूरतील एका अवलिया पर्यावरण प्रेमीने गटारीतील पाण्याचा सदुपयोग करत १० झाडे जगवली आहेत. आज कडाक्याच्या उन्हाळ्यात याच झाडांचा आधार मिळू लागला आहे.
अंकुश देवकते असे या वृक्षप्रेमीचे नाव आहे. माऊली म्हणून त्यांची लातुरामध्ये ओळख आहे. औसा रोडवरील राजीव गांधी चौकात माऊली चारचाकी वाहन घेवून प्रवाशांच्या प्रतीक्षेत असतात. या दरम्यानच्या कालावधीत गटारी लगतच्या रिकाम्या जागेत त्यांनी वृक्षारोपण करण्याचा निर्धार केला होता. मात्र, केवळ लागवडच नाही तर संगोपणाच्या दृष्टीनेही माऊली यांनी नियोजन केले होते.
गटारीच्या पाण्यावर झाडांची जोपासना करणे अगदी सहज शक्य आहे. मात्र, संगोपणामध्ये सातत्य ठेवण्याचे त्यांच्यासमोर आव्हान होते. त्यामुळे गेल्या ५ वर्षात त्यांनी दररोज झाडांना बाटलीच्या माध्यमातून पाणी पुरविले आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशीही माऊली सर्व झाडांना पाणी देऊनच घराकडे परतात. हा त्यांचा नित्यक्रम असून आता ५ वर्षाने त्यांच्या कष्टाचे फलित मिळाले आहे. काही प्रमाणात या झाडांची सावली पडत असून परिसरातील नागरिकांना याचा उपयोग होत आहे.
सध्या वृक्षलागवडीसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. परंतु, वृक्षजोपासण्यासाठी हवी ती काळजी घेतली जात नाही. त्यामुळे वृक्षलागवड करुनदेखील फायदा होताना दिसत नाही. मात्र, माऊली यांनी गटारीच्या पाण्यावर ५ वर्ष १० झाडांना जगवलेला उपक्रम आज वाटसरुंना सावली देण्याचे काम करत आहे.