कोल्हापूर - करवीर निवासिनी आई अंबाबाईची बुधवारी महिषासुरमर्दिनी रुपात पूजा बांधण्यात आली. दरवर्षी नवरात्रोत्सवात अष्टमीला अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रुपातच पूजा बांधली जाते. दरवर्षी आकर्षक पद्धतीने श्रीपूजक ही पूजा बांधत असतात. ही पूजा पाहण्यासाठी तसेच देवीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातील लाखो भाविक कोल्हापुरात येत असतात. आजसुद्धा सकाळपासून मोठ्या संख्येने भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी दाखल झाले होते.
आजच्या पूजेचे महत्व काय? :
दैत्य रंभासुर व महिषी (म्हैस) यांच्या मिलनातून महिषासुराचा जन्म झाला होता. तो ब्रम्ह देवाचा भक्त होता व घोर तपश्चर्येतून त्याने ब्रम्हदेवाकडून मानव, देव व दानव यांच्याकडून अपराजित राहण्याचे वरदान मिळवले होते. या वरदानाने तो उन्मत्त झाला व त्र्यैलोक्यावर अधिराज्य मिळवले. देवदेवतांना त्याने हैराण करुन सोडले होते व जनतेवर अत्याचार करत होता. त्याला त्रासून सर्व देवांनी ब्रम्हा, विष्णू व महेश यांच्याकडे धाव घेतली व महिषासुरापासून सुटका करण्याची विनंती केली. तेव्हा ब्रम्हा, विष्णू व महेश या त्रिमुर्तिंनी आपल्या क्रोधातून एक शक्ती प्रकट केली. ती साक्षात दुर्गा देवीच होती. तिला सर्व देव देवतांनी आपआपली अस्रे व शस्रे दिली. देवी दुर्गेने महिषासुराला आव्हान देउन दैत्य सेने बरोबर युद्ध पुकारले. आठ रात्री युद्ध करुन अष्टमीच्या रात्री तिने महिषासुराचा वध केला. म्हणूनच आजच्या दिवशी ही पूजा बांधली जाते. आजची पूजा श्रीपूजक सुकृत मुनिश्वर, सोहम मुनिश्वर, अरुण मुनिश्वर आणि मयुर मुनिश्वर यांनी बांधली.
हेही वाचा - अमरावतीच्या गणोजा देवी येथे कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीचे प्रतिरूप