कोल्हापूर - कोल्हापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा महापूर आला आहे. याचा फटका शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे महानगरपालिकेचे सर्व पंपिंग स्टेशन पाण्याखाली गेल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न उद्भवल्याने महानगर पालिकेच्या माध्यमातून तसेच अनेक सामाजिक संस्था, व्यक्तींच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. शहरातील सर्वच भागात आता टँकरसमोर नागरिक गर्दी करताना पाहायला मिळत आहे.
शहरातील चारही पंपिंग स्टेशन पाण्याखाली गेल्याने शहरात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. यामध्ये महानगरपालिकेचे काही टँकर, खाजगी टँकर शिवाय अनेक सामाजिक संस्थेच्या तसेच व्यक्तींच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे. जोपर्यंत पंपिंग स्टेशन पाण्याखाली आहेत, तोपर्यंत पाणी पुरवठा होणार नसून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त निखिल मोरे यांनी केले आहे.
हेही वाचा- VIDEO:...अन् मुख्यमंत्र्यांसमोरच पूरग्रस्त महिलेने फोडला वेदनांचा टाहो