कोल्हापूर : विधान परिषदेसाठी(Vidhan Parishad Election) काँग्रेसने(Congress) आपले दोन उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये कोल्हापूरातून सतेज पाटील(Satej Patil) यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा झाली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी(Sonia Gandhi) यांनी त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. याबाबत पक्षाचे सचिव मुकुल वासनिक यांनी अधिकृत माहिती दिली आहे. दरम्यान, सतेज पाटील हेच या ठिकाणी संभाव्य उमेदवार होते. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांपूर्वीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या उमेदवाराचेही नाव जाहीर
कोल्हापूर विधानपरिषदेसोबतच धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या उमेदवाराचेही नाव जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये कोल्हापुरातून सतेज पाटील तर धुळे-नंदुरबार मधून गौरव देवेंद्रलाल वाणी यांच्या नावाला सोनिया गांधी यांनी मंजुरी दिली आहे. दरम्यान, कोल्हापुरात सतेज पाटील यांनी उमेदवारी जाहीर होण्याच्याही आधीपासून प्रचाराला सुरुवात केली होती. त्यांनी दोन दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी आता विजयाचा दावा सुद्धा केला असून आपल्याकडे 416 पैकी 270 हुन अधिक मतदारांचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. त्यांच्याविरोधात भाजपकडून अमल महाडिक यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी सुद्धा विजयाचा दावा केला आहे. त्यामुळे मतदार दोघांपैकी कोणाला संधी देतात हेच पाहावे लागणार आहे.