कोल्हापूर - वीज बिल माफ व्हावे, या मागणीसाठी येत्या 7 जानेवारी रोजी कोल्हापुरात वाहनांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 'आम्ही विज बिल भरणार नाही' कृती समितीच्यावतीने हे अनोखे आंदोलन करण्यात येणार असून सरकारने लवकरात लवकर याबाबत निर्णय जाहीर करावा, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याबाबत आज कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनासुद्धा निवेदन देण्यात आले असून भविष्यात यापेक्षाही मोठ्या प्रमाणात लढा उभारावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
वाढीव वीज बिलावरून शहरात होर्डिंग्स
लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वजण आर्थिक संकटात होते. दुसरीकडे वाढीव वीज बिलाचा झटका ग्राहकांना देण्यात आला. त्यामुळे काहींना दुप्पट तर काहींना तिप्पटीने वीजबिले आली असल्याचे समितीच्या पदाधिकार्यांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत कोल्हापुरात लढासुद्धा सुरू झाला असून 'आम्ही लाइटबिल भरणार नाही' कृती समितीची स्थापना करून याबाबतचे फलकही लावण्यात आले आहेत.
7 जानेवारीला विविध वाहनांचा मोर्चा
येत्या 6 जानेवारीला कोल्हापुरातील गांधी मैदान येथून दुचाकीसह तीनचाकी, चारचाकी, ट्रक, टेम्पो, लक्झरी बस अशा विविध वाहनांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर राज्यातल्या सर्वच ग्राहकांना वीज बिल माफ करून दिलासा द्यावा अन्यथा कोल्हापूर राज्यभरात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुद्धा आंदोलकांनी दिला आहे.