कोल्हापूर- जगात भारी अशी ओळख असलेल्या कोल्हापूर शहरात कशाचा विरोध कशा पद्धतीने केला जाईल याचा नेम नाही. असाच काहीसा प्रकार कोल्हापुरातील मटण दरवाढीच्या विरोधात पाहायला मिळत आहे. शहरातील काही लोकांनीच मिळून आता मटणाचे दुकान सुरू केले आहे.
कोल्हापुरातील राजरामपुरीच्या पहिल्या गल्लीत हे दुकान सुरू केले असून इतर दुकानांच्या तुलनेत जवळपास सव्वाशे ते दीडशे रुपये स्वस्त मटण या ठिकाणी मिळत आहे. परवडणाऱ्या दरात मटण मिळत असल्याने खवय्यांची अक्षरशः झुंबड लागली असून लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जोपर्यंत कोल्हापुरातील मटण विक्रेते मटणाचे दर कमी करत नाहीत, तोपर्यंत आम्ही आमचे हे दुकान सुरूच ठेवणार असल्याचा इशाराच या आंदोलकांनी दिला आहे. सद्या कोल्हापुरात मटणाचे दर 580 रुपये किलो पर्यंत पोहोचले आहेत. यामध्ये किमान शंभर रुपयाने मटण स्वस्त करावे अशी मागणी यावेळी राजारामपुरी येथील आंदोलकांनी केली आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात सुद्धा अशा पद्धतीने एक स्वस्त मटणाचे दुकान सुरू करण्यात आले आहे.