कोल्हापूर - मुंबई वगळता आता राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका त्रिसदस्यीय प्रभाग रचनेवर आधारित घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाविकास आघाडी सरकारने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. सरकारच्या या निर्णयामुळे आता अनेकांना फायदा तर काहींना चांगलाच फटका बसणार आहे. शिवाय केवळ एकाच प्रभागात किंवा गल्लीत असलेली ताकद आता काहीही कामाची राहणार नसून, जो चांगलं काम करणार आहे त्यालाच लोकं संधी देणार असे चित्र दिसत आहे. त्यामुळे ठराविक मतदारांच्या जीवावर निवडुन यायचे दिवस आता संपले असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यासंदर्भातच त्रिसदस्यीय प्रभाग रचनेमुळे आता कोल्हापूरच्या महानगरपालिका निवडणुकीत काय परिणाम होणार? कोणाला फायदा होणार आणि कोणाला फटका बसणार यावर 'ई टीव्ही भारत'ने आढावा घेतलाय...
- महाविकास आघाडीच्या हितासाठीच त्रिसदस्यीय प्रभाग रचना?
दरम्यान, भाजप सरकारच्या काळात चार सदस्यीय प्रभाग रचना करून त्यांनी अनेक महापालिकेवर आपला झेंडा फटकावला होता. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर त्या निर्णयाला विरोध करत तो रद्द केला. आता बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा हा निर्णय झाला असून, मुंबई वगळून राज्यातील सर्वच आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्रिसदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सर्वच आगामी निवडणुका असणाऱ्या महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता यावी यासाठी हा निर्णय घेतला असेल तर सगळीकडे महाविकास आघाडी एकत्र लढणार का? हे सुद्धा पाहावे लागणार आहे. कोल्हापुरात यापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते व पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपण वेगवेगळे लढू आणि निवडणुकीनंतर वेळ पडल्यास पुन्हा एकत्र येऊ असे जाहीर केले आहे. त्यामुळे या निर्णयानंतर आता आणखी काय राजकीय हालचाली होणार हे सुद्धा पाहावे लागणार आहे. दरम्यान, शिवसेनासुद्धा स्वबळावर लढण्यासाठी सज्ज असून एकत्र लढविण्याससुद्धा त्यांचा होकार आहे. त्यामुळे निवडणुकीपर्यंत आणखी काय राजकीय हालचाली होतात हेच पाहावे लागणार आहे.
हेही वाचा - जागतिक पर्यटन दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात विविध उपक्रम - सतेज पाटील
- पक्षीय राजकारणास बळ मिळणार; मोजक्या मतांच्या जीवावर उड्या मारणाऱ्यांना बसणार फटका :
त्रिसदस्यीय प्रभाग रचनेमुळे आता पक्षीय राजकारणाला बळ मिळणार आहे. ज्या पक्षाची संबंधित प्रभागात ताकद असेल शिवाय संबंधित उमेदवारसुद्धा चांगले काम करत असेल तर त्यालाच नागरिक संधी देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवारसुद्धा काही प्रमाणात अडचणीत आल्याचे दिसून येत असून, जे केवळ 500 ते 600 मतांच्या जीवावर उड्या मारतात त्यांनाही चांगलाच फटका बसणार असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. शिवाय आता प्रत्येक पक्षाची स्वतःची विचारसरणी आहे. त्यामुळे पक्षीय राजकारणालाही आता बळ मिळणार आहे.
- शिवसेना स्वबळावर लढायला तयार : राजेश क्षीरसागर
कोल्हापूरमध्ये शिवसेनेची मोठी ताकद असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी म्हंटले आहे. शिवाय यापूर्वीच्या अनुभवानुसार महापालिकेच्या निवडणुकीत शेवटच्या दिवसापर्यंत शिवसेनेला मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. मात्र, शेवटच्या दोन दिवसातच पैशाचा वारेमाप वापर इतर पक्षांकडून केला जातो आणि त्याचा फटका शिवसेनेला बसतो, असेही त्यांनी म्हंटले. मात्र, आता शिवसेनासुद्धा ताकतीने आगामी निवडणुकीत उतरणार असून या त्रिसदस्यीय प्रभाग रचनेमुळे शिवसेनेला याचा फायदा होईल, असा विश्वासही क्षीरसागर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला. शिवाय राज्यातील महाविकास आघाडीप्रमाणे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतसुद्धा हीच आघाडी निर्माण झाल्यास त्याला आमचा कोणताही विरोध नसणार, असे सांगत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी म्हंटले. शिवाय जरी वेगळे लढलो तरी शिवसेना पूर्ण ताकतीने या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
- शहरात महाविकास आघाडी निर्माण झाली तर नेत्यांमध्ये नाराजीचा सूर : भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे
त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय यापूर्वी भाजप सरकारने घेतला होता. त्याला आता महाविकास आघाडीने विरोध केला. मात्र, बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी पुन्हा हा निर्णय घेतला. त्याचे भाजपकडून स्वागतच असल्याचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी सांगितले आहे. दरम्यान, या प्रभाग रचनेमुळे खऱ्या कार्यकर्त्याला आणि चांगल्या विचारांवर चालणाऱ्या पक्षाला नागरिक स्वीकारणार आहेत. जर शहरात महाविकास आघाडी निर्माण झाली तर बऱ्याच प्रमाणात नाराजांची संख्या असणार आहे. त्याचा फायदाही भाजपला नक्कीच होणार असल्याचे राहुल चिकोडे यांनी सांगितले. शिवाय जरी तीनही पक्ष वेगवेगळे लढले तरी त्यांना अनेक अडचणी आहेत. आम्ही भाजप स्वतंत्र आल्याने आम्हाला कोणतीही अडचण नसून आमचे विचार पक्के आहेत. शहराच्या दृष्टीने चांगले काम करण्याची इच्छा आहे त्याचा आम्हाला फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
- निर्णयाचे स्वागत, मात्र झालेल्या खर्चाला जबाबदार कोण? सामान्य नागरिकांचा सवाल :
या निर्णयाचे आमच्याकडून स्वागत आहे. मात्र, ज्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची इतर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शिवाय प्रभाग रचना झाली आहे मात्र आता पुन्हा प्रभाग रचना बदलावी लागणार, आरक्षण बदलावे लागणार आहे. यावर होणाऱ्या खर्चाला जबाबदार कोण? असा सवाल शहर नागरी कृती समितीचे रमेश मोरे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे भविष्यात ज्या महापालिकांची मुदत संपणार आहे, त्या ठिकाणी हा निर्णय अंमलात आणा, आता ज्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्या महापालिकेत आहे त्याचं पद्धतीने निवडणुका होऊद्या, असेही त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - कोल्हापुरातील जमावबंदीचे आदेश मागे; जिल्हा दंडाधिकारी राहुल रेखावार यांची माहिती