कोल्हापूर - महाविकास आघाडी सरकारचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाई ( Raju Shetty About ED Inquiry ) बद्दल भाष्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी केले आहे. सर्व जण चोर आणि लबाड आहेत. एकमेकांचे हिशोब चुकते करण्यासाठी ईडीचा इन्कमटॅक्स सारख्या यंत्रणांचा वापर करत आहेत. दोघांनी स्वार्थासाठी सरकारी यंत्रणांचा उपयोग करू नये असा सल्ला ही राजु शेट्टी यांनी दिला आहे.
राजु शेट्टी यांचे महावितरण कार्यालयासमोर आंदोलन -
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काल पासून कोल्हापुरातील महावितरणच्या मुख्य कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांना दिवसाला 10 ते 12 तास वीज द्यावी या सह अन्य मागण्या संघटनेकडून करण्यात आल्या आहेत. तर आंदोलनात स्वतः राजू शेट्टी सहभागी झाले आहेत. कालची रात्र राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांबरोबर महावितरण कार्यालयासमोरच काढले असून ते तेथे थान मांडून बसले आहेत. दरम्यान काल रात्री महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांची मनधरणी करण्यासाठी आले होते चर्चा देखील झाली मात्र राजू शेट्टी यांनी जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही आणि शेतकऱ्याला दिवसा वीज मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेण्यात येणार नाही असा इशारा दिला आहे.
सगळेच चोर आणि लबाड आहेत -
महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची सकाळी आठ वाजल्यापासून एडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. याबाबत बोलताना राजू शेट्टी यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहे. गेल्या 7 ते 8 वर्षापासून इन्कम टॅक्स, ईडी या सारख्या सरकारी यंत्रणांचा वापर हा स्वार्थासाठी आणि राजकारणासाठी होत आहे. ईडी, इन्कमक्स टॅक्स विभाग हे कार्यकर्त्या सारखे वागत आहेत. किरीट सोमैया हे साखर कारखान्यातील घोटाळ्याचे सांगत आहेत आणि त्यांचे ऐकून ईडी लगेच छापे टाकत आहे. मात्र किरीट सोमैया वेगळ काही बोलत नसून सात वर्षापूर्वी पासून मी जे एफ आय आर दाखल केले आहे तेच घेऊन बोलत आहेत. सात वर्षांपूर्वी मी एफ.आय. आर. दाखल केली होती तेव्हा ईडी ला दखल घ्यावी वाटली नाही. मात्र आता राजकीय दृष्ट्या फायदेशीर आहे म्हणून किरीट सोमैयांच नाव पुढे करून कारवाई केली जात आहे.महावितरण विभागात सुद्धा अनेक घोटाळे आहेत. ते सुद्धा काढणार असून त्यात भारतीय जनता पार्टीचे नेते कोणी नसतील तर तेथे सुद्धा इडी ची कारवाई होईल. एकमेकांचे हिशोब चुकते करण्यासाठी ईडीचा उपयोग केला जात आहे. असे न करता त्याचा उपयोग जनतेच्या कामासाठी करा.कारवाई करणारे सुद्धा काचेच्या घरात आहेत हे विसरू नये. कोणी धुतल्या तांदळासारखे नाहीत. सगळेच चोर आणि लबाड आहेत आणि हे सर्व महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.
राजू शेट्टींनी रात्र काढली रस्त्यावरच -
कोल्हापुरात महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज, वीज बिलांची अन्यायी वसूली आणि बिलांची दुरुस्ती या मागण्यासाठी कालपासून महावितरणच्या कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, कालरात्री राजू शेट्टी यांना महावितरणच्या अधिकाऱ्यानी भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे त्यांनी कालची रात्र ही महावितरणच्या दारातच काढली आहे. दरम्यान आता हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ही त्यांनी दिला आहे.