कोल्हापूर - कोल्हापुरातील शिक्षण सहसंचालक कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी ही मागणी केली आहे. कोल्हापूर शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या कारभाराचा गोंधळ आमदारांनी थेट रस्त्यावरच मांडला.
हेही वाचा - नियमबाह्य शुल्क आकारणाऱ्या खासगी शाळांवर कडक पाऊल उचलण्याचे बच्चू कडूंचे निर्देश
गेल्या अनेक वर्षांपासून सहसंचालक कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी अनेकांना वेठीस धरले आहे. कार्यालयाविरोधात शेकडो तक्रारी समोर आल्या आहेत. या तक्रारींबाबत चर्चा करण्यासाठी आबिटकर यांनी कार्यालयाच्या बाहेरच आढावा बैठक घेतली. यावेळी शेकडो तक्रारदार देखील या बैठकीला उपस्थित राहिले आणि थेट आमदारांच्या समोरच येथील अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारी मांडल्या. यामध्ये अनेक गंभीरस्वरूपाच्या तक्रारी उजेडात आल्या आहेत. निवृत्त होऊन दोन ते चार वर्षे झाली आहेत, मात्र अजूनही त्यांना पेन्शन मिळत नाही, भविष्य निर्वाह निधी मिळालेला नाही, पैसे घेतल्याशिवाय एकही अधिकारी काम करत नसल्याचा आरोप अनेक तक्रारदारांनी केला आहे.
अशा अनेक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी समोर आल्याचे ऐकताच संतापलेल्या आमदार प्रकाश आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापत संपूर्ण कार्यालयाची चौकशी होऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली.
दरम्यान, आमदार आबिटकर यांच्या या रोखठोक भूमिकेचे अनेकांनी स्वागत केले असून दोषी सर्वच अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.