कोल्हापूर - वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात 8 दिवसांसाठी कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. मध्यरात्री 12 वाजल्यापासून कोल्हापूर मध्ये लॉकडाऊनला सुरुवात झाली असून 23 मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकावर गुन्हे नोंदवून कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे.
नागरिकांचा चांगला प्रतिसाद
लॉकडाऊनच्या आजच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूर शहरात नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पोलिसांकडून सुद्धा सकाळपासून विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे नेहमी गजबजलेले रस्ते आज मोकळे पडल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिक सुद्धा विनाकारण बाहेर पडत नसून, नियमांचे पालन करून, फक्त मेडिकल इमर्जन्सीसाठीच बाहेर पडत आहेत. 23 मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अशाच पद्धतीने प्रतिसाद देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
'नागरिकांचे आभार'
'कोल्हापूर जिल्ह्यात काल रात्रीपासून कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. नागरिकांनी लॉकडाऊनला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल नागरिकांचे आभार मानतो. पुढील आठ दिवस नागरिकांनी घरात राहून पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे', असे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे यांनी सांगितले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील साडेतीन हजार पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. तसेच होमगार्ड, महापालिकेचे कर्मचारी दिवस-रात्र रस्त्यावर असणार आहेत. जिल्ह्यातील गल्लीबोळात देखील पोलिसांनी चार्ली पेट्रोलिंग, बिट पेट्रोलिंग सुरू केले आहे. कंट्रोल रूमची संख्या वाढवली असून, त्यातील मोबाईल नंबरची संख्यादेखील वाढवली आहे. नागरिकांन आपत्कालीन घटनेवेळी 100 या क्रमांकावर संपर्क करून मदत मागू शकतात, असेही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतला गोव्यातील कोविड परिस्थितीचा आढावा