कोल्हापूर - करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातील अनेक भाविक येत असतात. अंबाबाईच्या दर्शनाबरोबरच मंदिर परिसरातील काही छोट्या मंदिरातील देवी देवतांचे दर्शन घेऊन जातात. मात्र आजही अनेकांना अंबाबाई मंदिरातील मातृलिंग मंदिराबाबत माहिती नाहीये. आशा सर्व भाविकांना आज 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर या मंदिराचे दर्शन घडवणार आहोत.
साडे तीन शक्तिपीठांपैकी एक पीठ अशी करवीर निवासिनी आई अंबाबाईची ओळख आहे. चालुक्यांच्या काळात इ.स. 700 च्या आसपास म्हणजेच सुमारे 1200 वर्षांपूर्वीचे हे अतिप्राचीन मंदिर! मंदिरात अनेक छोटी छोटी मंदिरं देखील आहेत. मात्र यातील काही मंदिरं वरर्षातून ठराविक वेळीच उघडली जातात. मंदिराच्या बांधणी आणि रचनेत अनेक वैशिष्ट्य आढळतात. अनेक वैशिष्टयांपैकी महत्वाचं म्हणजे मातृलिंग मंदिर. अनेकांना हे कुठे आहे ते माहिती नाही. तर अनेकांना त्याबद्दल माहितीच नाहीय. वर्षांतून काही ठराविक वेळच हे मंदिर उघडले जाते. अंबाबाई मंदिराच्या अंतर्गत रचनेत दोन मजले करण्यात आले आहेत. खाली गाभाऱ्यात करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती असून तिच्या डोक्यावरच म्हणजेच वरच्या मजल्यावर मातृलिंग मंदिर आहे.
खाली कासव चौक आणि गर्भगृहात अंबाबाईची मूर्ती आहे. त्याच पद्धतीने वरच्या मजल्यावर नंदी आणि गर्भगृहात मातृलिंग आणि चौथऱ्यावर गणेशाची मूर्ती असून याच मंदिरावर मुख्य शिखर आहे. या मंदिरात जाण्यासाठी चिंचोळ्या गुप्त पायऱ्या आहेत. पण वर्षातील केवळ मोजक्या दिवशी हे मंदिर दर्शनासाठी उघडले जाते. देशामध्ये कुठेही असे दुमजली मंदिर नसून अंबाबाई मंदिर हे एकमेव उदाहरण असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.
अंबाबाईच्या मूर्तीशेजारी ज्या पद्धतीने तीन वेगवेगळ्या खोल्या आहेत, त्याच पद्धतीने वरच्या मजल्यावर सुद्धा छोट्या छोट्या तीन खोल्या आढळतात. त्याला ध्यान गृह असेही म्हटले जाते. मंदिराची हीच रचना आणि बांधणीमुळे त्याला वशेष बनवते. भविष्यात सर्वच भक्तांना ऑनलाइन प्रक्रियेद्वारे मातृलिंग मंदिराचे दर्शन घेता येत असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले.
वर्षातून केवळ 3 वेळा मातृलिंग मंदिराचे दरवाजे उघडतात
मातृलिंग मंदिरात भक्तांना दररोज दर्शनासाठी प्रवेश नाहीये. मात्र वर्षातून तीनवेळा मंदिर उघडले जाते. श्रावणी सोमवार, वैकुंठ चतुर्थी, महाशिवरात्री आणि दररोज साडे बारा वाजता आरती होत असते. त्या आरतीवेळी काही काळासाठी दरवाजा उघडला जातो. श्रावण सोमवारी, वैकुंठ चतुर्थी, महाशिवरात्री या तिन्ही वेळा भक्तांसाठी मातृलिंग मंदिर दर्शनासाठी खुले केले जाते.