कोल्हापूर : राज्य सरकारने येत्या 15 ऑगस्टपासून कोरोना निर्बंधांतून हॉटेल, मॉल आदी व्यवसायांना शिथीलता दिली आहे. मात्र नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या धार्मिक स्थळांना मात्र अजूनही बंदी आहे. त्यामुळे कोल्हापूरसह राज्यातील अनेक ठिकाणांहून मंदिरे सुरू करण्याची मागणी होताना दिसत आहे. मंदिर आणि पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायिकांनीही मंदिर सुरु करावी अशी मागणी केली आहे. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरातील व्यावसायिकही हीच मागणी करत आहेत.
व्यवसाय असून नसल्यासारखा, पर्यटकांवरच आमचा उदरनिर्वाह
अंबाबाई मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात हार, फुल विक्रेते, कोल्हापुरी तसेच पारंपरिक दागिन्यांची दुकानं, हळदी कुंकू, ओटी, पूजेचे साहित्य, मूर्ती आदी वस्तू विक्री करणारे छोटे मोठे वायवसायिक आहेत. मात्र कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मंदिरं बंद असल्याने यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. पर्यटन तसेच धार्मिक स्थळे बंद असल्याने राज्यभरातून येणारे भाविक आता येऊ शकत नाही. केवळ कोल्हापुरातील स्थानिक भाविक अंबाबाईच्या दर्शनाला येत असतात. ते सुद्धा मंदिराच्या दरवाजावरूनच दर्शन घेऊन त्यांना माघारी जावे लागत आहे. त्यामुळे या परिसरात असलेल्या विविध व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शासनाने आता सर्व काही सुरू केले आहे. त्यामुळे मंदिरसुद्धा सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
भाविकही अंबाबाईच्या दर्शनासाठी व्याकूळ
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनाला दररोज हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र कोरोनामुळे अजूनही मंदिर बंदच आहेत. सध्या अंबाबाई मंदिर बंद असल्याने येथील महाद्वारापासूनच भाविकांना अंबाबाईचे दर्शन घ्यावे लागत आहे. त्यात श्रावण महिन्यात दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. कधी एकदा अंबाबाई मंदिर सुरू होतेय आणि अंबाबाईचे दर्शन घेतोय अशी भावना अनेक भक्त व्यक्त करताना दिसत आहेत.
हेही वाचा - राज्य सरकारला मंदिरांपेक्षा मदिरेची चिंता, प्रवीण दरेकरांची टीका