कोल्हापूर - रविवारी रात्री उशिरा शाहूपुरी येथील तिसऱ्या गल्लीत सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी शाहूपुरी येथील हुक्का पार्लर चालवणारे संशयित आरोपी ऋषिकेश प्रकाश पाटील आणि चंदगड तालुक्यातील पोवाची वाडी येथील श्रीधर वैजनाथ बेलेकर या दोघांना अटक करण्यात आलीय, तर हुक्का ओढणाऱ्या २९ तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील बहुतांश तरुण हे गांधीनगरमधील, तर काही तरुण कोल्हापूर शहरातील आहेत.
या हुक्का पार्लरमधून काचेच्या भांड्यासह ८ पाइप तसेच हुक्का पिण्यासाठी वापरण्यात येणारे विविध फ्लेवरचे ६ डबे, असा सुमारे १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहूपुरी येथील तिसऱ्या गल्लीमध्ये राहणारा ऋषिकेश पाटील हा आपल्या घरातच हुक्का पार्लर चालवत होता. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी रात्री छापा टाकला. हुक्का पार्लरचा मालक ऋषिकेश पाटील व हुक्का पार्लर चालवणारा श्रीधर बेलेकर या दोघांना अटक करण्यात आली. याठिकाणी हुक्का ओढणाऱ्या २९ तरुणांना ताब्यात घेण्यात आले. यातील २५ तरुण गांधीनगर येथे राहणारे आहेत, तर चार तरुण कोल्हापूर शहरात राहणारे आहेत. पोलिसांकडून या हुक्का पार्लरमधून काचेचे भांडे, ८ पाइप, हुक्का ओढण्यासाठी वापरण्यात येणारे विविध फ्लेवरचे ६ डबे असा सुमारे १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी अचानक छापा टाकल्यामुळे हुक्का ओढणाऱ्यांची धावपळ उडाली होती. तसेच या सर्वांना पोलीस ठाण्यामध्ये आणल्यानंतर त्यांचे नातेवाईक व मित्रांनी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. भर मध्यवस्तीमध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या या हुक्का पार्लरवर कारवाई झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.