कोल्हापूर - फाईलवरील अक्षर बघून मंत्रालयातील एका कर्मचाऱ्यालाच मुख्यमंत्र्यांनी भेटायला बोलवल्याची घटना कधी घडली नसावी. मात्र, काल गृह निर्माण विभागातील एक फाईल मुख्यमंत्र्यांच्या हातात पडली आणि फाईलच्या मुखपृष्ठावर असलेले कोरीव अक्षर पाहून मुख्यमंत्र्यांनी थेट संबंधित कर्मचाऱ्यालाच भेटायला बोलवून घेतले. दत्तात्रय बाबुराव कदम (रा. कासारवाडी, ता. भुदरगड, कोल्हापूर) असे या मंत्रालयातील लिपिकाचे नाव आहे.
कोल्हापूरातल्या भुदरगड तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यातील दत्तात्रत बाबुराव कदम मंत्रालयात लिपिक पदावर रुजू आहेत. मंत्रालयात गृह निर्माण विभागात ते काम करतात. खरेतर दत्तात्रय यांचे अक्षर अगदी वळणदार आणि कोरीव असल्याने प्रत्येकालाच ते आवडत आले आहे. मात्र, त्यांच्याच विभागातील काही फाईल काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात पडल्या. फाईलच्या मुखपृष्ठावरील अक्षर पाहून त्यांनी तत्काळ हे अक्षर कोणाचे आहे. याबाबत मुख्य सचिवांकडे विचारणा केली. त्यांना हे अक्षर गृह निर्माण विभागातील लिपिक दत्तात्रय कदम यांचे असल्याचे समजले. त्यांनी फाईल तशीच बाजूला ठेवत दत्तात्रय यांना भेटायचे असल्याचे, म्हणत त्यांना बोलवायला सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी भेटायला बोलावणे यातला आनंद खूपच वेगळा
दत्तात्रत कदम यांचे वळणदार अक्षराचे मुख्यमंत्र्यांनी भरभरून कौतुक केले. शिवाय ही कला जोपासण्यासाठी शुभेच्छाही दिल्या. दरम्यान, आपले अक्षर सर्वांना आवडणे यापेक्षा ते अक्षर पाहून मुख्यमंत्र्यांनी भेटायला बोलावणे यातला आनंद खूपच वेगळा आहे. अशी भावना कदम यांनी व्यक्त केली आहे. तसेच, माझ्यासाठी हा अभिमानाचा क्षण होता असेही ते म्हणाले आहेत.