कोल्हापूर - प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन कोल्हापूरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. राज्याचे गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभात छत्रपती शाहू स्टेडियम येथे ध्वजारोहण करण्यात आले. सर्व कोरोना योद्यांनी अहोरात्र प्रयत्न करून जिल्ह्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे ‘आम्ही कोल्हापूरी जगात भारी’ ही उक्ती सार्थ ठरविली असल्याचे गौरवोद्गार काढत जिल्ह्याचे कोरोना रिकव्हरी प्रमाण 96.4 टक्के असून जिल्हा राज्यात अव्वल असल्याचेही पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हंटले आहे.
यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, पोलीस अधीक्षक डॉक्टर शैलेश बळकवडे, महापालिका आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉक्टर स्टीवन अल्वारिस यांचेसह शासकीय अधिकारीआदी मान्यवर आणि ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा -
यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणले, सर्व कोरोना योद्यांनी अहोरात्र प्रयत्न करून जिल्ह्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे ‘आम्ही कोल्हापूरी जगात भारी’ ही उक्ती सार्थ ठरविली आहे. जिल्ह्याचे कोरोना रिकव्हरी प्रमाण 96.4 टक्के असून जिल्हा राज्यात अव्वल आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 598 जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यात नव्या उद्योगात 261.6 कोटींची गुंतवणूक झाल्याने 4 हजार 927 रोजगार निर्मिती होणार असल्याचे सांगत पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.
लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद -
कोरानाविरूध्द लढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात कोरोना केंद्र, आरोग्य केंद्रे व रूग्णालये शासकीय व खासगी सहकार्यातून आस्थापित केली. त्यामुळे जिल्ह्यातील रूग्णांची चांगल्या प्रकारे काळजी घेण्यात आली, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, यासाठी सर्व अधिकारी-कर्मचारी, नागरिकांनी सहकार्य केले. संशयीत रुग्णांच्या तत्काळ तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अत्याधुनिक RT-PCR and CB-NAAT मशिन सर्व प्रथम उपलब्ध केले. आज अखेर कोल्हापूरात 3 लाख 26 हजार 773 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 49 हजार 857 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 48 हजार 76 जणांना जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 96.4 टक्के इतके रिकव्हरीचे प्रमाण असून राज्यात जिल्हा अव्वल स्थानावर आहे. ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात 15 हजार 500 इतक्या रेमडीसीवीर इंजेक्शनचे मोफत वाटप करणारा राज्यात कोल्हापूर हा एकमेव जिल्हा आहे. जिल्हयात 10 हजार किटचे वाटप करुन गंभीर अजारी नसलेल्या रुग्णांना घरीच उपचार दिले असल्याचेही त्यांनी यावेळी म्हंटले.