कोल्हापूर - वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग ट्विट करत संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी राज्यसभेच्या निकालानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. वाघाचे पांघरून घेतल्यावर वाघासारखे दिसते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. हेच मांडत संभाजीराजेंनी शिवसेनेला डिवचले आहे. त्यांच्या या ट्विटची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
हेही वाचा - फडणवीसांच्या व्यूहरचनेपुढे महाविकास आघाडी सपशेल फेल, धनंजय महाडिक विजयी
42 मतांच्या संख्याबळाचा खोटा आव : 42 मतांच्या संख्याबळाचा खोटा आव आणणाऱ्या शिवसेनेची आणि संजय राऊत यांची चांगलीच फजिती झाली हेच संभाजीराजे यांना जणू सुचवायचे आहे. कारण त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल हाती येताच अभंग ट्विट केला. त्यातून अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला. दरम्यान, सहाव्या जागेवर छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून दावा सांगितला होता. मात्र, शिवसेना व संजय राऊत यांनी ताठर भूमिका घेत त्यांना पाठिंबा देण्याचे नाकारून पक्षाचा उमेदवार उभा केला. संजय राऊत यांनी तर आमची 42 मते आम्ही अपक्ष उमेदवाराला का देऊ? असा थेट सवाल करत पाठिंबा हवा असेल तर पक्षात प्रवेश करा, अशी अट संभाजीराजे यांच्यावर घालण्यात आली होती. पण आज लागलेल्या निकालाने शिवसेना व संजय राऊत यांचा हा 42 मतांचा फुगा फुटला आहे. सेनेकडून सहाव्या जागेसाठी संजय पवार यांना उमेदवारी दिली मात्र त्यांचा यामध्ये पराभव झाला. त्यामुळे जी मते सेनेकडे मुळात नव्हतीच, त्या मतांसाठी शिवसेना छत्रपती संभाजीराजे यांच्यावर अटी लादत होती आशा प्रतिक्रिया सुद्धा संभाजीराजे यांच्या समर्थकांकडून येत आहेत.
राज्यसभेच्या सहा जागांचा निकाल जाहीर - राज्यसभेच्या सहा जागांचा निकाल ( Maharashtra Rajya Sabha Election 2022 ) जाहीर झाला आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचे तीन तसेच भाजपचेही तीन उमेदवार विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेनेने आपला उमेदवार जिंकणारच असा दावा केला होता. त्यादृष्टीने त्यांनी व्युहरचनाही केली होती. मात्र निकालानंतर त्यांचे गणित फसल्याचे दिसून आले. संजय पवार यांचा पराभव झाला, तर धनंजय महाडिक निवडून आले.
हेही वाचा - RS Election Result 2022 : 'अशा'प्रकारे जिंकले राज्यसभेचे उमेदवार.. पहा सत्ताधारी- विरोधकांच्या प्रतिक्रिया..