कोल्हापूर - इटली देशातील फ्लॉरेन्स या शहरात असलेल्या कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज द्वितीय ( tomb of Chhatrapati Rajaram Maharaj in Italy ) यांच्या समाधीस आज ( 9 जुलै ) संभाजीराजे छत्रपती ( Sambhajiraje Chhatrapati ) यांनी युवराज्ञी संयोगिताराजे व चिरंजीव शहाजीराजे यांच्यासह प्रत्यक्ष भेट देऊन अभिवादन केले. यावेळी इटली मधील भारतीय दूतावास व फ्लॉरेन्स शहराची महापालिका यांच्या वतीने याठिकाणी सर्व तयारी करण्यात आली होती. तेव्हा भारताच्या इटली येथील राजदूत डॉ निना मल्होत्रा, राजनीतिक सल्लागार डॉ. क्रिस्तीयानो मॅगीपिंटो, भारतीय मेहरूनकर दांपत्य, फादर जेम्स व फ्लॉरेन्स महापालिकेचे मान्यवर वर्ग कुटुंबीयांसह उपस्थित होते.
काय आहे इतिहास? - शिक्षणाचे महत्त्व जाणणारे व आधुनिक विचारांचे छत्रपती राजाराम महाराज हे 1870 साली वयाच्या 20 व्या वर्षी युरोपच्या दौऱ्यावर गेले. परदेश प्रवास करणारे ते पहिलेच छत्रपती होते. परदेशातील आधुनिक व लोकोपयोगी व्यवस्था आपल्या राज्यात राबविण्यासाठी, त्या गोष्टी शिकण्यासाठी त्यांचा हा दौरा होता, हे त्यांनी स्वतः लिहिलेल्या डायरीतून लक्षात येते. कोल्हापूरातील ऐतिहासिक 'राजाराम कॉलेज'ची स्थापना त्यांनीच केलेली आहे. युरोपवरून परतीच्या प्रवासात असताना हवापालट न मानवल्याने 1871 साली वयाच्या केवळ 21 व्या वर्षी या दूरदर्शी महाराजांचा इटली देशातील फ्लॉरेन्स येथे देहांत झाला. येथेच अर्ना व मुग्नोने नदीच्या संगमस्थळी महाराजांवर अंत्यसंस्कार करण्यात आले व त्यांची सुंदर समाधी उभारण्यात आली.
महाराजांच्या स्मरणार्थ फ्लॉरेन्स प्रशासनाने तेथे शेकडो एकर बाग फुलविली. आजही ती प्रशस्त बाग आहे. छत्रपती राजाराम महाराज द्वितीय हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे आजोबा होते. शाहू महाराजांनी देखील जुलै 1902 साली याठिकाणी भेट देऊन पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करून राजाराम महाराजांस अभिवादन केले होते. त्यानंतर शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी देखील येथे भेट देऊन आपल्या पूर्वजांस अभिवादन केले होते. कोल्हापूरचे विद्यमान छत्रपती शाहू महाराज व याज्ञसेनीराजे महाराणीसाहेब यांनी देखील येथे भेट दिलेली आहे. याच ठिकाणी संभाजीराजे छत्रपती, युवराज्ञी संयोगिताराजे आणि चिरंजीव शहाजीराजे यांनी महाराजांच्या या समाधीस भेट दिली. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी केलेल्या प्रथेनुसार संभाजीराजेंनी सुद्धा समाधीची पूजाअर्चा केली व महाराजांस मनोभावे अभिवादन केले.
'नदी उत्सव' समाधी स्थळी आयोजित करावा - फ्लॉरेन्स हे इटली मधील कला व सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. प्रतिवर्षी या शहरात 'नदी उत्सव' भव्य प्रमाणात साजरा केला जातो. महाराजांची ही ऐतिहासिक समाधी देखील नदी किनारीच असल्याने पुढील उत्सव महाराजांच्या समाधी स्थळी आयोजित करावा, अशी कल्पना संभाजीराजेंनी फ्लॉरेन्स महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करताना मांडली. सर्वांना ही कल्पना आवडली व तसा निर्णय घेण्यासाठी कार्यवाही करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.