कोल्हापूर - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महाविद्यालय अंतर्गत असलेल्या यावर्षीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांनी भरलेली परीक्षा फी परत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील एका शिवाजी विद्यापीठाच्या अतंर्गत 3 जिल्ह्यातील एकूण 279 महाविद्यालये येतात. या महाविद्यालयाकडून लॉकडाऊनपूर्वी अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी परीक्षा फी घेतलेली आहे. या सर्व महाविद्यालयात वेगवेगळ्या विभागातील जवळपास 2.5 लाख विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची सरासरी 13.50 कोटी रुपये परीक्षा फी आपल्या विद्यापीठाकडे जमा झालेली आहे. राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये असे लाखो विद्यार्थी असून, त्या विद्यार्थ्यांची फी माफ होणे गरजेचे आहे. सर्व विद्यार्थी शेतकरी, शेतमजूर, कामगार, तसेच गरीब सर्वसामान्य वर्गातील जनतेची मुले आहेत. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाने सध्या सर्वत्र मंदीची लाट सुरू आहे. लाखो लोकांच्या नोकर्या गेल्या आहेत. कामगार वर्ग आर्थिक संकटात सापडलेला आहे. शेतीमालाला भाव नाही. त्यातच राज्य सरकारकडून महाविद्यालयाच्या अंतिम परीक्षा रद्द केल्या आहेत. परीक्षाच रद्द झाल्याने राज्यातील सदर परीक्षेची फी माफ करावी जेणेकरून पालकांना व विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, असे शेट्टींनी निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, फी परत करण्याबाबत शासन सकारात्मक असून, विद्यार्थांना परीक्षा फी परत देण्यामध्ये काही तांत्रिक अडचण आल्यास त्याच फीमध्ये पुढील वर्षीच्या परीक्षा घेतल्या जातील, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.